स्कॉर्पिओतून येऊन दरोडा टाकणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश; तीन सराईत दरोडेखोर जेरबंद, पुणे ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई…

तुळशीराम घुसाळकर
इंदापूर (पुणे) : स्कॉर्पिओ वाहनातून येऊन वयोवृद्ध नागरिकांवर हल्ला करत दरोडा टाकणाऱ्या आंतर जिल्हा दरोडेखोरांच्या टोळीचा पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा व इंदापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन सराईत आरोपींना अटक करून दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले असून, नागरिकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या टोळीवर मोठा आघात करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १५ डिसेंबर रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास विठ्ठलवाडी (ता. इंदापूर, जि. पुणे) येथे हा धक्कादायक प्रकार घडला. फिर्यादी सिंधु पांडुरंग भोंग (वय ६५) या आपल्या पती पांडुरंग भोंग व बहीण मुक्ताबाई गुलाब ननवरे यांच्यासह घरी झोपलेल्या असताना, पती पांडुरंग भोंग हे बाथरूमसाठी घराबाहेर गेले. त्याच वेळी दोन पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ वाहनांतून आलेल्या तीन ते चार अनोळखी दरोडेखोरांनी घरात घुसखोरी केली. त्यांनी फिर्यादी, त्यांचे पती व बहिणीला मारहाण करून गळ्यातील सोन्याचे गंठण, कानातील डोरले जबरदस्तीने चोरून नेले.
याच कालावधीत बागलफाटा, बावडा येथील आबासाहेब शिवाजी बागुल यांच्या आई शांताबाई शिवाजी बागुल या झोपलेल्या असताना, त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेण्यात आले. या दोन्ही घटनांमध्ये सुमारे दीड तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, टीव्ही व रोख रक्कम असा एकूण ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटण्यात आला. वयोवृद्ध महिलांवर मारहाण करून दरोडा टाकल्याने परिसरात तीव्र संताप व भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी तातडीने गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना देत स्थानिक गुन्हे शाखा व इंदापूर पोलीस ठाण्याची दोन विशेष पथके तयार केली. या पथकांनी समांतर तपास सुरू केला.
घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दोन पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ वाहनांचा वापर झाल्याचे स्पष्ट झाले. ही वाहने चोरीची असून गुन्ह्यानंतर सोलापूरच्या दिशेने गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
यानंतर गोपनीय बातमीदारांचे जाळे सक्रिय करण्यात आले. त्यातून सदर गुन्हा आबा आप्पा शिंदे (वय ३५, रा. मोहा, ता. कळंब, जि. धाराशीव) याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार तपास पथक मोहा येथे दाखल झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने आबा शिंदे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने दरोड्याचा गुन्हा केल्याची कबुली दिली.
त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यात त्याचे आणखी दोन साथीदार सहभागी होते. त्यामध्ये सुनिल भिमा पवार व अजय उन्नेश्वर गवळी (दोघेही रा. मोहा, ता. कळंब, जि. धाराशीव) यांचा समावेश आहे. हे दोघे रत्नागिरी येथे गुन्हा करताना स्कॉर्पिओ वाहनासह मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता, १ जानेवारी २०२६ पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे. आरोपींविरोधात यापूर्वीही विविध जिल्ह्यांमध्ये मालमत्ता चोरी व दरोड्याचे अनेक गुन्हे दाखल असून ते सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक (बारामती विभाग) गणेश बिरादार व उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक विलास नाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे यांच्यासह पोलीस अंमलदार बाळासाहेब कारंडे, अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहीवळे, निलेश शिंदे, वैभव सावंत, तुषार चव्हाण, अंकुश माने, विनोद लोखंडे, सुरज गुंजाळ यांनी ही कारवाई यशस्वी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक गावडे करत आहेत.
या कारवाईमुळे आंतरजिल्हा दरोडेखोरांच्या टोळीचा कणा मोडला असून, नागरिकांनी निश्चिंत राहावे, असे आवाहन पुणे ग्रामीण पोलिसांनी केले आहे.
Editer sunil thorat



