
पुणे : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्याने राजकीय पक्षांमध्ये इच्छुक उमेदवारांच्या नाराजीचा स्फोट होऊ लागला आहे. पक्षाने उमेदवारी नाकारताच अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला असून, त्याहून अधिक वेदनादायी बाब म्हणजे उमेदवारी द्यायची नसल्याने वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी थेट फोन उचलणेच बंद केल्याचे सुत्रामार्फत माहिती मिळत आहे.
पक्षासाठी एकनिष्ठेने तब्बल एक तप काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना शेवटच्या क्षणी अंधारात ठेवण्यात आले. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत काही तासांवर येऊन ठेपलेली असतानाही पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी संपर्काबाहेर राहिल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. “पक्षासाठी दिवस-रात्र झटून काम करायचे, रस्त्यावर उतरून प्रचार करायचा, प्रत्येक आंदोलनात पुढे राहायचे आणि शेवटी आयाराम-गयारामांना सहज उमेदवारी मिळायची असेल, तर निष्ठेचे मोल तरी काय?” असा सवाल आता उघडपणे विचारला जात आहे.
“आम्ही रक्ताचे पाणी करून पक्षाचे काम केले. मात्र बाहेरून आलेल्या लोकांना किंवा ऐनवेळी पक्षात प्रवेश करणाऱ्यांना उमेदवारी कशी काय दिली जाते?” असा संतप्त सवाल इच्छुक उमेदवार आणि निष्ठावंत कार्यकर्ते आपापसात व्यक्त करत आहेत. पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करूनही डावलले गेल्याची भावना कार्यकर्त्यांच्या मनात खोलवर रुजली आहे.
निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून उमेदवारी कशाच्या आधारे दिली गेली, हा आजही न सुटणारा प्रश्न आहे. “माझा निष्ठावान कार्यकर्ता” असे म्हणत केवळ दिवस ढकलले गेले की काय, असा प्रश्न उपस्थित होत असून वरिष्ठांच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलणे हे पक्षासाठी दीर्घकालीन नुकसानकारक ठरणार का, याचा निर्णय येणारा काळच देईल, यात शंका नाही. मात्र, या नाराजीचे परिणाम मतदानाच्या माध्यमातून जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आता कार्यकर्त्यांकडून दिला जात आहे.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उफाळून आलेला हा असंतोष पक्षासाठी धोक्याची घंटा मानली जात असून, निष्ठा विरुद्ध आयत्यावेळी आलेली उमेदवारी हा संघर्ष अधिक तीव्र होत चालल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.
Editer sunil thorat



