
थेऊर (ता. हवेली) : नववर्षाच्या औचित्याने हवेली तालुक्यातील थेऊर येथील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी आज भाविकांची अभूतपूर्व गर्दी झाली होती. मात्र या गर्दीचा गैरफायदा घेत मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच फुले, दुर्वा व प्रसाद विक्रीसाठी बसलेल्या दुकानदारांमुळे भाविकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप न केल्यास मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे.
पहाटे श्री चिंतामणीचे पुजारी महेश आगलावे यांनी महापूजा केल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. नववर्षाची सुट्टी, त्याचबरोबर भीमा कोरेगाव येथे जात असलेल्या भिमसैनिकांची मोठी संख्या यामुळे पहाटेपासूनच थेऊर गावाला अक्षरशः जत्रेचे स्वरूप आले होते. मंदिराच्या आत-बाहेर प्रचंड गर्दी झाली होती.
मात्र मंदिराकडे जाणारा मुख्य रस्ता आधीच अरुंद असताना, रस्त्याच्या दुतर्फा फुले व दुर्वा विक्रीची दुकाने थाटण्यात आल्याने रस्ता आणखी संकुचित झाला. विशेषतः मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या एका हॉटेलच्या समोरील जागेत मोठ्या प्रमाणावर विक्रेते बसल्यामुळे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची अक्षरशः कोंडी झाली. याचा फटका सर्वाधिक लहान मुले, महिला व वृद्धांना बसला. धक्काबुक्की, गोंधळ व तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
काही वर्षांपूर्वी मांढारदेवी काळूबाई जत्रेत अशाच प्रकारे दुकानदारांमुळे अरुंद झालेला रस्ता आणि प्रचंड गर्दी यामुळे भीषण दुर्घटना घडली होती. त्या घटनेत अनेकांना नाहक प्राणास मुकावे लागले होते. त्याच इतिहासाची पुनरावृत्ती थेऊर येथे होणार का, असा सवाल भाविकांमध्ये उपस्थित केला जात आहे.
भाविकांनी स्पष्टपणे मत व्यक्त केले की, मंदिर प्रशासन, ग्रामपंचायत व पोलीस यंत्रणांनी वेळेत लक्ष न दिल्यास येथेही मोठी दुर्घटना घडू शकते. प्रवेशद्वारासमोरील अतिक्रमण तातडीने हटवणे अत्यावश्यक आहे.
यासंदर्भात लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी सांगितले की, “पंधरा दिवसांपूर्वी मंदिर विश्वस्तांनी दिलेल्या पत्रानुसार संबंधित विक्रेत्यांना हटवण्यात आले होते. यानंतरही कोणी प्रवेशद्वारासमोर बसल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.”
दरम्यान, लोणी काळभोर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या थेऊर पोलीस चौकीचे API बिराजदार यांनी प्रत्यक्ष गस्त घालून फळ व प्रसाद विक्रेत्यांना सक्त ताकीद दिली. आदेश न पाळणाऱ्या विक्रेत्यांची नावे नोंदवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रश्न कायम – दुर्घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का, की आधीच ठोस पावले उचलणार?
Editer sunil thorat






