जुन्या वादातून तरुणाचा निर्घृण खून; फुरसुंगी परिसर हादरला, दोन आरोपी अटकेत…

फुरसुंगी (पुणे) : जुन्या वादाच्या कारणावरून एका तरुणाचे अपहरण करून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना फुरसुंगी पोलीस स्टेशन हद्दीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करत दोन आरोपींना अटक केली असून एका विधीसंघर्ष बालकास ताब्यात घेण्यात आले आहे.
फुरसुंगी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 451/2025 भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 103(1), 140(1), 189(2), 190, 191(2), 351(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा 31 डिसेंबर 2025 रोजी पहाटे 00.50 वाजता नोंदविण्यात आला.
या प्रकरणातील फिर्यादी राहुल राजेंद्र सुतार (वय 25, व्यवसाय सुतारकाम, रा. संतोषी माता कॉलनी, काळेपडळ, पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास परी सुपर मार्केट, संतोषी माता कॉलनी येथे आरोपींनी जुन्या वादातून प्रसाद वीरभद्र देवज्ञ (वय 21, रा. परळी वैजनाथ, जिल्हा बीड) याच्यावर प्राणघातक हल्ला केला.
आरोपी किरण भैरू चव्हाण, टिल्लू मिसाळ, आदित्य देशमुख, रोहित गायकवाड व टिल्लू मिसाळ याचा मित्र गणेश (पूर्ण नाव अज्ञात) यांनी बांबूने मारहाण करून जबरदस्तीने प्रसाद याला वाहनात बसवले. त्यानंतर त्याला संकेत विहार, लेन नंबर 16, फुरसुंगी येथील गणपती मंदिराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत नेऊन दगड व लोखंडी रॉडने डोक्यात जबर मारहाण करून जीवे ठार मारल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणात पोलिसांनी किरण भैरू चव्हाण (वय 38) व रोहित भरत गायकवाड (वय 19) यांना अटक केली असून आदित्य जनार्दन देशमुख (वय 17) हा विधीसंघर्ष बालक असल्याने त्याच्यावर बालन्याय कायद्यानुसार कारवाई करण्यात येत आहे. घटनेची गंभीरता लक्षात घेता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.
यामध्ये पोलीस उपआयुक्त डॉ. राजकुमार शिंदे (परिमंडळ 6), गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त नितीन पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले (हडपसर विभाग) यांच्यासह फुरसुंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे उपस्थित होते.
गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार करत असून गुन्हा दाखल करण्याचे काम पोलीस उपनिरीक्षक महेश नलावडे यांनी केले आहे. सध्या परिसरात शांतता असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
Editer sunil thorat



