किरकोळ कारणावरून इनामदार वस्तीत दोन गटांत हाणामारी; दोघे गंभीर जखमी, ११ जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल…

तुळशीराम घुसाळकर
लोणी काळभोर (ता. हवेली) : लोणी काळभोर येथील इनामदार वस्ती परिसरात किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना बुधवारी (दि. ३१ डिसेंबर) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. या घटनेत दोघेजण गंभीर जखमी झाले असून लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एकूण ११ जणांविरोधात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षा व मोटारसायकलच्या किरकोळ धडकेवरून वादाला सुरुवात झाली. हा वाद पाहता पाहता शिवीगाळ, धमकी आणि लोखंडी हत्यार व लाकडी दांडक्याने मारहाणीपर्यंत वाढला.
या प्रकरणी शहीदा मुबारक इनामदार (वय ५०, रा. इनामदार वस्ती, बाजारमळा रोड, लोणी काळभोर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मनसुर गनी इनामदार (४५), रिहान मन्सुर इनामदार (२३), जैद मन्सुर इनामदार (२५), निहाल खालीद इनामदार (२०) व खालीद गनी इनामदार (४५) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी शहीदा इनामदार यांचा भाचा शाहरुख नजीर शेख याच्या रिक्षाचा धक्का मनसुर इनामदार यांच्या मोटारसायकलीस लागल्याने वाद निर्माण झाला. यानंतर आरोपींनी शाहरुख शेख, परवेझ इनामदार तसेच शहीदा इनामदार यांना शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच शहीदा इनामदार यांचे दिर हरुन इब्राहिम इनामदार यांना निहाल इनामदार याने लोखंडी हत्याराने कपाळावर व पाठीवर मारहाण करून जखमी केले.
दरम्यान, याच घटनेतून दुसऱ्या गटाकडूनही प्रतितक्रार दाखल करण्यात आली आहे. मनसुर गनी इनामदार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हरुन इब्राहिम इनामदार (५०), रेश्मा हरुन इनामदार (४५), परवेझ हरुन इनामदार (२२), शायरान (५५), शाहरुख नजीर शेख (३०) व करीन इनामदार (२६) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनसुर इनामदार हे त्यांची ओला कंपनीची मोटारसायकल पार्किंगमधून बाहेर काढत असताना शाहरुख शेख याने रिक्षाने धडक दिली व शिवीगाळ केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यानंतर मनसुर इनामदार, त्यांची पत्नी आशिया तसेच मुले रिहान व निहाल यांना जीवे मारण्याची धमकी देत दगड व लोखंडी हत्याराने मारहाण करण्यात आली. या हाणामारीत निहाल इनामदार व हरुन इब्राहिम इनामदार हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एकूण ११ जणांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी व प्रल्हाद जगताप करत आहेत.
Editer sunil thorat



