
किवळे (पुणे) : किवळे येथील नवनियुक्त लिगसी इंपिरियल सोसायटीत सरत्या वर्षाला निरोप देत आणि नववर्षाचे स्वागत करत ३१ डिसेंबरच्या पूर्वसंध्येला उत्साहपूर्ण आणि आगळ्यावेगळ्या पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला सोसायटीतील अबालवृद्धांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
नववर्ष स्वागत समारंभात लहान मुले, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध मनोरंजनात्मक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. लहान मुलांसाठी फुगे व बॉलच्या स्पर्धा, महिलांसाठी संगीत खुर्ची तर ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्रपणे आयोजित संगीत खुर्ची स्पर्धेला उपस्थितांचा विशेष प्रतिसाद लाभला. सर्वच वयोगटांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला.
कार्यक्रमात अल्पोपहार म्हणून सर्व उपस्थितांना कुरकुरीत सुकी भेळ, कांदा-मटकी भेळ तसेच मसाला दूधाचे वाटप करण्यात आले. “दारू नको, दूध प्या” हा सामाजिक आणि आरोग्यदायी संदेश देत नववर्षाचे स्वागत करण्यात आले, ज्यामुळे कार्यक्रमाला वेगळीच सकारात्मक ओळख मिळाली.
या यशस्वी कार्यक्रमासाठी सोसायटीचे चेअरमन प्रवीण साळुंके, सेक्रेटरी विशाल कुंभार आणि खजिनदार अशोक भुजबळ यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच सांस्कृतिक मंडळाचे मुकेश पाटील, धीरज सोनावणे आणि अमित काळे यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले.
सामाजिक बांधिलकी जपत, आरोग्याचा संदेश देणारा हा नववर्ष स्वागत सोहळा परिसरात चर्चेचा विषय ठरला असून सोसायटीतील सदस्यांनी अशा उपक्रमांचे स्वागत केले आहे.
Editer sunil thorat



