“नागरिकांचे जीव धोक्यात, प्रशासन झोपेत ; खासदार डॉ. अमोल कोल्हेंना नागरिकांचा थेट सवाल”
कवडीपाठ टोल नाक्यावर अपघातांचा धोका वाढला; स्पीड ब्रेकरसह तातडीच्या उपाययोजनांची नागरिकांची मागणी...

कदमवाकवस्ती, (ता. हवेली) : पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाठ टोल नाका परिसरात वाढत्या वाहतुकीमुळे अपघातांचा धोका गंभीर बनला असून, स्थानिक नागरिकांनी तात्काळ स्पीड ब्रेकर (स्लोमर/रंबल स्ट्रिप), शाळा परिसराचे सूचना फलक तसेच गाव दर्शविणारे साईन बोर्ड बसविण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र जनआंदोलन व रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे. कवडीपाठ टोल नाका परिसरात पुणे ते सोलापूर आणि सोलापूर ते पुणे या दोन्ही दिशांनी वाहनांची मोठ्या प्रमाणावर व अतिवेगाने वाहतूक सुरू असते. या परिसरात विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, कामगार आणि स्थानिक नागरिकांना रोज जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागील काळात स्टार सिटी परिसरातील शितोळे कुटुंबातील दोन सख्या बहिणींचा अपघात झाल्यानंतर नागरिकांचा संताप अधिक तीव्र झाला होता. अपघातानंतर सांत्वनासाठी लोकप्रतिनिधी आले ; मात्र त्यानंतर या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. सामाजिक कार्यकर्ते सुशिल महाराज काळभोर व विशाल गुजर यांनी सांगितले की, “कवडीपाठ टोल नाका येथे कोणत्याही क्षणी मोठा अपघात होऊ शकतो. वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी तातडीने रंबल स्ट्रिप, स्पीड रिड्युसर पट्टे आणि अलर्ट साईन बोर्ड बसविणे अत्यावश्यक आहे.” स्थानिक नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया देताना म्हटले की, “कवडीपाठ टोल नाका येथे खासदार डाँ. अमोल कोल्हे यांनी स्वतः येऊन रस्ता क्रॉस करून पाहावा. नागरिकांना दररोज किती कसरत करावी लागते, याचा अनुभव त्यांना प्रत्यक्ष आल्याशिवाय राहणार नाही.”
याबाबत खासदार डाँ. अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “हा रस्ता NHI (राष्ट्रीय महामार्ग इन्फ्रास्ट्रक्चर) कडून MSRDC कडे हस्तांतरित झाला आहे. NHI आणि MSRDC यांच्यात समन्वयाचा काहीसा घोळ दिसून येत आहे. त्यामुळे उपाययोजना नेमक्या कधी होणार, फ्लायओव्हर कधी होणार याबाबत स्पष्टता मिळत नाही. अपघात रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने बैठक घेणे आवश्यक आहे. सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्रितपणे मॉनिटरिंग करणे गरजेचे आहे. स्थानिक नागरिक आंदोलन करत असतील तर मी त्यांच्या सोबत राहणार असून, लवकरात लवकर संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करून उपाययोजना करण्याचा प्रयत्न करणार आहे.”
वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंन्द्र करणकोट यांनी सांगितले की, “कवडीपाठ परिसरातील सुरक्षाविषयक उपाययोजनांसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे आतापर्यंत तीन वेळा पत्रव्यवहार करण्यात आला आहे. रंबल स्ट्रिप, स्पीड रिड्युसर पट्टे आणि अलर्ट स्ट्रिप्स बसविण्याची मागणी करण्यात आली आहे. वाहतूक शाखेची हद्द मोठी असून मनुष्यबळ वाढल्यानंतर त्या ठिकाणी वाहतूक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा प्रयत्न केला जाईल.”
“संबधित प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन उपाययोजना कराव्यात, अन्यथा भविष्यात होणाऱ्या कोणत्याही दुर्घटनेस प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा कवडीपाट येथील ग्रामस्थांनी दिला आहे.”
Editer sunil thorat



