एसटी प्रवासात महिलांचे दागिने चोरणाऱ्या तीन महिलांना लोणी स्टेशन परिसरातून अटक ; चार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे शाखा युनिट ४ ची धडक कारवाई, लोणी काळभोर परिसरातून आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश...

तुळशीराम घुसाळकर
कदमवाकवस्ती : एसटी प्रवासादरम्यान प्रवाशांच्या पिशव्यांमधून दागिने आणि रोकड चोरणाऱ्या तीन महिलांच्या टोळीला अखेर गुन्हे शाखा युनिट ४ च्या पथकाने गजाआड केले आहे. या तिघी महिलांना लोणी रेल्वे स्टेशन परिसरातून अटक करण्यात आली असून पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून सुमारे चार लाख बारा हजार रुपयांचा सोन्याचा आणि रोकडीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गुन्हे शाखा युनिट ४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक झालेल्या महिलांची नावे अशी आहेत —आशा देविदास लोंढे (वय ६०), रेखा मनोहर हातागंळे (वय ३५), हेमा दिगंबर हातागंळे (वय ४१) तिघीही लोणी रेल्वे स्थानकाजवळील कदमवाकवस्ती, ता. हवेली (जि. पुणे) येथील रहिवासी आहेत.
दिवाळीच्या गर्दीत चोऱ्यांचा सिलसिला…
दिवाळीच्या काळात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असल्याने एसटी स्थानकांवर गर्दी वाढलेली असते. याच गर्दीचा फायदा घेत या महिला प्रवाशांच्या पिशव्या, हँडबॅग आणि दागिन्यांवर डल्ला मारत असत.
मुंबई-पुणे महामार्गावरील वाकडेवाडी एसटी स्थानकात आणि कात्रज परिसरात काही दिवसांपूर्वी अशा स्वरूपाच्या चोऱ्यांच्या घटना घडल्या होत्या.
यापैकी एका प्रकरणात नाशिकहून सांगलीकडे प्रवास करणाऱ्या महिलेचे दागिने चोरीला गेले होते. ती वाकडेवाडी स्थानकात उतरली असताना, कात्रज येथून पुढील प्रवासासाठी बसची वाट पाहत असताना तिच्या पिशवीतील दागिने गायब झाले. या घटनेनंतर युनिट ४ ने सखोल तपास सुरू केला.
गुन्हे शाखेचा सापळा…
तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, वाकडेवाडी पीएमपी थांब्याजवळ संशयित महिला वारंवार दिसत असल्याचे समोर आले. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट ४ च्या पथकाने परिसरात गुप्तपणे देखरेख ठेवली. काही तासांच्या पाळतीनंतर पोलिसांना या तिघी महिला लोणी रेल्वे स्टेशन परिसरात दिसल्या. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले.
सुरुवातीला महिलांनी चौकशीत उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र सखोल चौकशीदरम्यान त्यांनी शेवटी एसटी प्रवासादरम्यान महिलेच्या पिशवीतून दागिने चोरल्याची कबुली दिली.
चार लाखांचा ऐवज जप्त…
महिलांच्या ताब्यातून पोलिसांनी रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण ४ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हा ऐवज चोरलेल्या प्रवाशांकडूनच मिळविल्याचे उघड झाले आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त निखील पिंगळे आणि सहायक आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, उपनिरीक्षक वैभव मगदुम, तसेच पोलीस कर्मचारी हरिष मोरे, एकनाथ जोशी, संजय आढारी, प्रवीण भालचिम, विठ्ठल वाव्हळ, भरत गुंडवाड, मयुरी नलावडे आणि रजपूत यांनी सहभाग घेतला.
गुन्हे शाखेच्या या वेळी केलेल्या कारवाईमुळे प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण असून, सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी दाखविलेली तत्परता कौतुकास्पद ठरली आहे.
Editer sunil thorat



