सुनिल थोरात
पुणे : पुणे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांतील गट-गण रचनेबाबत २०२२ मध्ये निश्चित केलेल्या प्रारूपावर राज्य शासनाने शिक्कामोर्तब केला असुन यासंदर्भात अंतिम रचना जाहीर केली आहे.
याबाबतचा अध्यादेश अधिकृतरित्या प्रसिद्ध करण्यात आला असून, त्यानुसार आता पुणे जिल्हा परिषदेसाठी ७३ गट व १४६ गण निश्चित करण्यात आले आहेत.
हवेली व मुळशी तालुक्यातील २३ गावे महानगरपालिका हद्दीत समाविष्ट झाली आहेत. त्यामुळे पुणे महानगरपालिकेचा विस्तार झाला असून परिणामी हवेली आणि मुळशी तालुक्यातील तालुक्यातील ७ गट कमी झाले आहेत. नवीन गट रचनेत जुन्नर, खेड, भोर, दौंड आणि इंदापूर तालुक्यातील प्रत्येकी एक गटांची वाढ झाली आहे.
पुणे जिल्ह्याची ग्रामीण लोकसंख्या नगर जिल्ह्यापेक्षा कमी झाल्याने गटाची २ व गणांची संख्या ४ ने कमी झाली आहे. तर हवेली तालुक्यातील गट संख्या तब्बल ७ ने कमी झाली आहे. लोकसंख्येची सरासरी लक्षात घेऊन तालुकानिहाय गट व गणांची रचना पुन्हा करण्यात आली असून, यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेण्यात आली होती. तालुकानिहाय गट व गण रचना – जाहीर करण्यात आलेल्या अंतिम आकडेवारीनुसार, जुन्नर तालुक्यात ८ गट आणि १६ गण, खेड तालुक्यात ८ गट आणि १६ गण, इंदापूर तालुक्यात ८ गट आणि १६ गण, तर दौंड व शिरूर तालुक्यात प्रत्येकी ७ गट व १४ गण निश्चित करण्यात आले आहेत.
आंबेगाव, मावळ आणि बारामती तालुक्यांमध्ये प्रत्येकी ५ ते ६ गट आणि १० ते १२ गणांची रचना करण्यात आली आहे. भोर, पुरंदर व हवेली तालुक्यांत प्रत्येकी ४ ते ६ गट तर वेल्हा तालुक्यात सर्वात कमी म्हणजे २ गट व ४ गणांची रचना करण्यात आली आहे. मुळशी तालुक्यात ३ गट आणि ६ गणांची रचना निश्चित झाली आहे.
या नव्याने निश्चित झालेल्या गट व गण रचनेनुसार, पुणे जिल्हा परिषदेसाठी एकूण ७३ गट आणि १४६ गण निश्चित करण्यात आले आहेत. ही अंतिम रचना २०२५ मधील संभाव्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. या बदलांमुळे अनेक तालुक्यांमध्ये राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा