अक्कलकोटातून स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची 29 वी “पालखी परिक्रमा” उत्साहात प्रस्थान 243 दिवसांची राज्यव्यापी धर्मयात्रा सुरू…

अक्कलकोट : अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय, श्री अन्नपूर्णामाता की जय या जयघोषात स्वामीभक्तांच्या श्रद्धेची परंपरा उजळवत श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची भव्य “पालखी परिक्रमा” रविवारी तीर्थक्षेत्र अक्कलकोटातून निघाली.
न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हा दिव्य सोहळा संपन्न झाला.
गेल्या 28 वर्षांपासून सातत्याने काढल्या जाणाऱ्या या धार्मिक यात्रेचे हे 29वे वर्ष असून, परिक्रमेचा शुभारंभ श्री स्वामी समर्थ पादुका पूजनाने झाला. महाप्रसादालयात झालेल्या त्या मंगलपूजनात श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, देवस्थानचे मुख्य पुरोहित प.पू. मोहनराव गोविंदराव पुजारी यांचे चिरंजीव मंदार पुजारी, तसेच श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे प.पू. अण्णू महाराज पुजारी प्रमुख उपस्थित होते.
पूजनानंतर न्यासाच्या परिसरातील श्री शमी विघ्नेश गणेश मंदिर, श्री भवानी माता मंदिर, समाधी मठ, तसेच श्री मल्लिकार्जुन आणि खंडोबा मंदिरात आरत्या झाल्यानंतर पालखीचा शुभप्रस्थान सोलापूरकडे निघाला. भक्ती, ढोल-ताशे, टाळ-मृदंग, भावगीते आणि निःस्वार्थ सेवाभाव या वातावरणात परिक्रमा थाटात मार्गस्थ झाली.
ही परिक्रमा २४३ दिवस महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यातील प्रमुख दैवस्थानांमधून प्रवास करून, दिनांक 15 जुलै 2026 रोजी पुन्हा अक्कलकोट नगरीत परतणार आहे. भक्तांच्या ओढीने आणि संतपरंपरेच्या प्रकाशाने नटलेली ही राज्यव्यापी धर्मयात्रा यंदाही भव्यतेने पार पडणार आहे, अशी भक्तांची श्रद्धा आहे.
Editer sunil thorat




