आंबळे गावातील दरोडा उघडकीस; दोन सराईत गुन्हेगार अटकेत, पाच गुन्ह्यांची कबुली…
शिरूर पोलिसांची मोठी कारवाई : आंबळे दरोडा प्रकरणातील दोघांना अटक...

पुणे (शिरूर) : तालुक्यातील आंबळे गावात ६ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास घडलेल्या थरारक दरोड्याचा पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभाग आणि शिरूर पोलीस स्टेशनच्या संयुक्त तपास पथकाने छडा लावत पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात दोन सराईत दरोडेखोरांना अटक करण्यात आली असून, पाच गंभीर गुन्ह्यांची कबुली त्यांनी दिली आहे.
अटक करण्यात आलेले आरोपी म्हणजे संजय तुकाराम गायकवाड (वय ४५, रा. धनगरवाडी, भोकरदन, जि. जालना) आणि सागर सुरेश शिंदे (वय १९, रा. संत तुकाराम नगर, मंठा, जि. जालना) हे असून, ते जालना जिल्ह्यातील अट्टल गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर अनेक जिल्ह्यांत दरोडे, जबरी चोरी आणि घरफोडीचे एकूण १३ गुन्हे दाखल आहेत. संजय गायकवाड हा टोळीचा म्होरक्या असून त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाईही झाली आहे.
घटनेच्या दिवशी सहा दरोडेखोरांनी आंबळे गावातील एका घरात घुसून दोन वृद्ध महिलांना लाकडी दांडक्याने मारहाण केली होती. त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, डोरले, कर्णफुले व जोडवी असे एकूण १.६४ लाख रुपयांचे दागिने लुटण्यात आले. या प्रकरणी कल्पना प्रताप निंबाळकर (वय ६०, रा. आंबळे) यांनी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली होती.
पोलीस तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांनी सिल्व्हर रंगाची तवेरा गाडी वापरल्याचे समोर आले. गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी संजय गायकवाडला नगर-पुणे रोडवर सापळा रचून अटक करण्यात आली. चौकशीत त्यांनी आंबळे दरोड्यासह इतर पाच गंभीर गुन्ह्यांची कबुली दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अप्पर अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर व शिरूर निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकात सहाय्यक निरीक्षक कुलदीप संकपाळ यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी मोलाची भूमिका बजावली.
या कामगिरीमुळे पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत असून, नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे. इतर आरोपींचा शोध सुरु असून, आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुख्य संपादक श्री सुनिल थोरात



