राजन पाटलांच्या मुलाकडून अजितदादांना थेट ललकार ; रोहित पवारांचा पलटवार ; “अंगात मस्ती सत्तेची…!”

सोलापूर : अनगर नगरपंचायत निवडणुकीत घडलेले नाट्यमय घडामोडी आणि त्यानंतरची जोरदार राजकीय बयानबाजी राज्याच्या राजकारणात चांगलीच तापली आहे. माजी आमदार राजन पाटील यांचे मोठे चिरंजीव विक्रांत उर्फ बाळराजे पाटील यांनी “अजितदादा कोणाचाही नाद करा, पण अनगरकरांचा करू नका” असा थेट आणि एकेरी भाषेत केलेला इशारा आता राज्यभर चर्चेत आहे.
अनगरमध्ये अर्ज बाद झाल्यानंतर झालेल्या जल्लोषादरम्यान विक्रांत पाटील यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उज्वला थिटे यांचा अर्ज तांत्रिक त्रुटींमुळे बाद झाल्यानंतर पाटील समर्थकांकडून मोठा उत्साह व्यक्त करण्यात आला. त्याच वेळी विक्रांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट नावाने उद्देशून दिलेला ‘हल्लाबोल’ सध्या राजकीय वर्तुळात खळबळ माजवत आहे.
या पार्श्वभूमीवर कर्जत–जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी कठोर प्रतिक्रिया देत बाळराजेंचा समाचार घेतला.
रोहित पवार म्हणाले, “राजन पाटील साहेब ज्येष्ठ नेते, त्यांचा आदर आहे. पण त्यांच्या चिरंजीवांनी अजितदादांवर एकेरी भाषेत बोललेला व्हिडिओ पाहून अत्यंत खेद वाटला. सत्तेच्या जोरावर अंगात येणारी मस्ती क्षणभंगुर असते. सत्ता येत-जात असते; हे कदाचित त्यांना माहिती नसावे.”
तसेच भाजपवर निशाणा साधत ते म्हणाले,
“मतचोरीच्या आधारावर उभे असलेले हे सत्तेचे इमले कधी कोसळतील सांगता येत नाही. भाजपच्या नादी लागल्यावर महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा विसर पडतो. राजन पाटील साहेबांनी आपल्या चिरंजीवांना समज द्यावी ही अपेक्षा.”
दरम्यान, अनगर नगरपंचायतीत अनेक दशकांच्या बिनविरोध निवडणुकीच्या परंपरेला राष्ट्रवादीच्या उज्वला थिटे यांनी आव्हान देत अर्ज दाखल केला होता. पोलिस बंदोबस्तात केलेल्या त्यांच्या अर्ज सादरीकरणाची राज्यभर चर्चा झाली होती; मात्र अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांच्या आक्षेपांनंतर छाननीदरम्यान थिटे यांचा अर्ज बाद करण्यात आला.
अर्ज बाद होताच राजन पाटील समर्थकांचा जल्लोष सुरू झाला. या उत्साहात विक्रांत पाटील यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलले असून, त्यानंतर त्यांनी केलेली ती ‘ललकार’ आता राजकीय वादळाचे केंद्रबिंदू ठरली आहे.
अनगरची निवडणूक ‘बिनविरोध’ परंपरेपासून थेट उच्चस्तरीय राजकीय चकमकीपर्यंत पोहोचल्याचे चित्र सध्या राज्यभर चर्चेत आहे.
Editer sunil thorat



