मुरुड (जंजिरा) : काशीद येथील समुद्रकिनारी पुण्यातील शाळेच्या मुख्याध्यापकांचा बुडून मृत्यू होण्याची घटना शुक्रवारी घडली. धर्मेंद्र देशमुख (वय ५६) असे त्यांचे नाव आहे. सध्या मुरुड व काशीद समुद्र समुद्र किनारी नाताळ सुट्टी असल्याने पर्यटकांनी खूप मोठी गर्दी केली आहे.
पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील पिसोली येथील महात्मा ज्योतिराव हायस्कूल येथील शाळेचा ११ जणांचा समूह काशीद समुद्र किनारी फिरण्यास आला होता. यामध्ये शिक्षकांसह मुख्याध्यापक सुद्धा आले होते. बहुसंख्य लोक काशीद समुद्र किनारी पोहण्यासाठी उतरले. पोहता पोहता या शाळेचे मुख्याध्यापक धर्मेंद्र देशमुख (वय ५६) हे खोलवर पाण्यात खेचले गेले. ते बराच वेळ पाण्याखाली राहिले. शेवटी किनार्यावरील जीवरक्षकांनी त्यांना पाण्याबाहेर काढून बोर्ली आरोग्य केंद्रात नेले. तेथून अधिक उपचारांसाठी अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पण तेथे उपचारापूर्वीच ते मरण पावले. या घटनेची नोंद मुरुड पोलिसात करण्यात आली आहे.
दरम्यान, सध्या नाताळच्या सुट्टीमुळे मुरुड तालुक्यात पर्यटकांची संख्या वाढली आहे. समुद्रकिनारेही फुलून गेलेले आहेत. भरतीच्यावेळी अनेक पर्यटक हे पाण्यात आनंद लुटत आहेत. पण अनेकदा पाण्याचा अंदाज न आल्याने अशा दुर्घटना घडत असल्याचे निदर्शनास येत आहे. काशीद ग्रामपंचायतीने पर्यटकांच्या सुचनेसाठी येथे सुचना फलक लावलेले आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष होताना दिसत असल्याने अशा दुर्घटना घडत आहे. नागरिकांनी सुचनेचे पालन करावयाचे असे प्रशासनाद्वारे सुचना देण्यात आल्या आहेत.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा