अपशिंगे मिलिटरी : लोकनियुक्त सरपंचांविरुद्ध गावकर्यांचा अविश्वास ठराव मंजूर…

वेणेगाव/अंगापूर : अपशिंगे मिलिटरी (ता. सातारा) येथे प्रथमच लोकनियुक्त सरपंचांविरुद्ध गावकर्यांनी गुप्त मतदान करून अविश्वास ठराव मंजूर केला आहे. सरपंच तुषार शिवाजी निकम यांच्याविरोधातील हा ठराव 256 मतांच्या फरकाने मंजूर झाला.
शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडली. गावातील एकूण 3391 मतदारांपैकी 1931 मतदारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 1907 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 37 मते अवैध ठरली. अविश्वास ठरावाच्या बाजूने 1063, तर विरोधात 807 मते पडली.
या मतदान प्रक्रियेचे अध्यासी अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी निलेश पाटील यांनी काम पाहिले. बोरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धोंडीराम वाळवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सहा बुथवर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली.
लोकनियुक्त सरपंचांविरुद्ध अशा प्रकारे गुप्त मतदानाने अविश्वास ठराव मंजूर होण्याची ही सातारा जिल्ह्यातील पहिलीच घटना ठरली आहे. या घटनेमुळे गावातीलच नव्हे तर तालुक्यातील राजकीय समीकरणांवरही परिणाम होण्याची चिन्हे आहेत.
Editer sunil thorat



