पुणे : राज्य सरकारकडून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्याचे सत्र सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार काल पुण्यातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहे.
यात पुण्यात एकाच कुटुंबातील तीन व्यक्ती पुण्याचा वेगवेगळा कार्यभार सांभाळणार आहेत. याची आता सर्वत्र चर्चा होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना पुणे जिल्हाधिकारी पदी पदस्थापना देण्यात आली आहे. जितेंद्र डुडी पुणे जिल्हाधिकारी पदावर असून त्यांच्या पत्नी आंचल दलाल भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) असून पुणे जिल्ह्यातील राज्य राखीव दलात (एसआरपीएफ) आहेत, तर शेखर सिंह डुडी यांचे मेहुणे असून ते काही महिन्यांपासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आयुक्त पदावर कार्यरत आहेत.
पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांना भारतीय प्रशासकीय सेवेतील सचिवपदी पदोन्नती मिळाल्याने त्यांची राज्याचे जमाबंदी आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी सातारा जिल्ह्याचे जितेंद्र डुडी यांना पदस्थापना देण्यात आली आहे.
कोण आहेत जितेंद्र डुडी?
जितेंद्र डुडी भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) २०१६ च्या शाखेतील सनदी अधिकारी आहेत. ते मूळचे जयपूरचे (राजस्थान) आहेत. त्यांनी प्रशासकीय सेवेत झारखंड येथून सुरुवात केली असून, केंद्र सरकारमध्ये सहाय्यक सचिवपदी देखील त्यांनी कामकाज पाहिले आहे. २०१८ मध्ये त्यांची महाराष्ट्रात पदस्थापना देण्यात आली. पुणे जिल्ह्यात यापूर्वी त्यांनी जुन्नर प्रांताधिकारी म्हणून काम पाहिले. तसेच, सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कारभार सांभाळला आहे. सातारा जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यानंतर आता पुणे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा