पुणे: पत्रकारांसमोर कायम आव्हाने उभी असतात. अशा परिस्थितीत पत्रकारांनी कायम निर्भीड आणि निःपक्षपाती असणे गरजेचे आहे. समाजाला संभ्रमावस्थेतून बाहेर काढून सत्य सांगणे, हे पत्रकारांचे कर्तव्य आहे.
पत्रकारितेची विश्वासार्हता टिकून राहिली, तर देशाची निश्चित प्रगती होईल, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.
मराठी पत्रकार संघाच्या वतीने रविवारी पत्रकार दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. दै. ‘पुढारी’चे चेअरमन आणि समूह संपादक डॉ. योगेश जाधव हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. दरम्यान, यानिमित्ताने आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन मीडिया इनोव्हेशन हॅकॅथॉन सोहळाही जे. डब्ल्यू मॅरिएट या पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडला.
कार्यक्रमाच्या दुसर्या सत्रात सी. पी. राधाकृष्णन यांनी मार्गदर्शन केले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. या वेळी लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर, किरण जोशी, संजय भोकरे आदी उपस्थित होते. या वेळी संपादक व्रतस्थ सन्मानाने दैनिक ‘पुढारी’च्या संचालिका स्मितादेवी जाधव यांना सन्मानित करण्यात आले.
या वेळी वरिष्ठ पत्रकार शीतल पवार, ज्येष्ठ पत्रकार यदू जोशी, विलास बढे, नीलेश खेडेकर यांनाही संपादक व्रतस्थ सन्मानाने सन्मानित करण्यात आले. तत्पूर्वी हॅकॅथॉनचे उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अकरा नद्यांचे जलपूजन करून झाले. या वेळी केंद्रीय सहकार व हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आदित्य जावडेकर, दीपक कुलकर्णी, मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी, सचिव मनीष केत, पुणे शहराध्यक्ष पंकज बिबवे आदी उपस्थित होते.
डॉ. योगेश जाधव म्हणाले, गेल्या दोन वर्षांत एआय सामान्य माणसाच्या कक्षेत सुलभ दरात आले आहे. एआयचे ज्या गतीने लोकशाहीकरण झाले आहे त्यावरून जगाची पुढील अनेक दशकांची वाटचाल लक्षात येत आहे. याकडे संधी आणि आव्हान म्हणूनही पाहावे लागेल. एआयच्या वापरामुळे खरे काय आणि खोटे काय, हे कळेनासे झाले आहे. अशा वेळी सत्य लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पत्रकारांची आहे. पत्रकारांनी गती आणि विश्वासार्हता यांचा समतोल राखायला हवा. किरण जोशी यांनी प्रास्ताविक केले. संदीप चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.
सारासार विचार करण्याची क्षमता मानवाकडून यंत्राकडे जाणार नाही, यासाठी प्रयत्न आवश्यक : डॉ. योगेश जाधव
सदसद्विवेकबुद्धी जागृत ठेवून सारासार विचार करण्याची क्षमता मानवाकडून यंत्राकडे जाणार नाही, यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत, असे प्रतिपादन दै. ‘पुढारी’चे चेअरमन डॉ. योगेश जाधव यांनी केले. ते पुढे म्हणाले की, एआयमुळे जातीय, धार्मिक, राजकीय दुजाभाव निर्माण होऊ शकतो. यावर कसे नियंत्रण आणता येईल, याचा विचार करण्याचीही गरज निर्माण झाली आहे. एआयचा योग्य वापर करण्यासाठी समाजमन तयार करणे, हे पत्रकारांचे कर्तव्य असून, एआय योग्य पद्धतीने आत्मसात करता आले, तर भारत सुपर पॉवर बनू शकेल.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा