पुणे (हडपसर) : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र संचलित करिअर कट्टा व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अध्यापकांसाठी आवाजाची कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेत डॉ. सोनाली लोहार यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र संचलित करिअर कट्टा उपक्रमाचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन झाले. महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी प्रास्ताविक केले.

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राच्या सहाय्याने “आवाज गुरुजनांचा वेध देशाच्या भवितव्याचा” राज्यातील शिक्षकांसाठी आवाजाची कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. शिक्षकांनी त्यांच्या आवाजाचा व्यवसायिक वापर कसा करावा, आवाजाची काळजी कशी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले जात असल्याचे करिअर कट्टा उपक्रमाचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांनी सांगितले.

मार्गदर्शिका सोनाली लोहार यांनी आवाजाची व्याख्या, अर्थ, ध्वनी निर्मिती करणारे स्वरयंत्र या विषयी माहिती देत आवाजाचा संबंध हा मेंदू, हृदय, फुफ्फुस तसेच मुखविवर यांच्याशी कसा असतो हे सांगून कंठसुचीता याविषयी मार्गदर्शन केले. दर पंधरा मिनिटांनी पाणी पिणे, आवाजाची काळजी घेण्यासाठी जेव्हा बोलण्याची गरज नसेल तेव्हा बोलणे टाळणे, बोलतांना हानिकारक सवयीमध्ये फोनवर मोठ्याने बोलणे, कारण नसताना किंचाळणे, ओरडणे, चिअरिंग करणे टाळले पाहिजे. आवाजाचा पोत सुधारण्यासाठी त्यांनी टिप्स देऊन प्रभावी अध्यापन करण्यासाठी आवाजाची काळजी घेतली पाहिजे असे त्यांनी आवाहन केले.

या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, डॉ. प्रशांत मुळे, प्रा.अनिल जगताप, प्रा. विलास शिंदे, करिअर कट्टा समन्वयक डॉ. नीता कांबळे, प्रा. संगीता देवकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संगीता देवकर यांनी केले तर आभार डॉ. नीता कांबळे यांनी मानले.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा