फुले वाडा परिसरात तातडीचे स्थलांतर! उपमुख्यमंत्री अजित पवारांचा प्रशासनाला आदेश…

मुंबई : पुण्यातील महात्मा फुले वाडा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या जतन व विस्तारीकरणाची कामे सुरु करण्यासाठी स्मारकाच्या सभोवतालच्या रहिवाशांचे स्थलांतर करणे आवश्यक आहे. जे रहिवासी पर्यायी जागेवर जाण्यास तयार आहेत, त्यांचे स्थलांतर करण्याची कार्यवाही तातडीने सुरु करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.
मंत्रालयात झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील महात्मा फुले वाडा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या जतन व विस्तारीकरण कामाचा आढावा घेतला. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, माजी आमदार समीर भुजबळ, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते. तर पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम आदी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, स्मारक विस्तारिकरण व एकत्रिकरणाच्या भूसंपादन कामासाठी राज्य शासनाने २०० कोटींचा निधी दिला आहे. मात्र अद्याप भूसंपादनाची कामे सुरु झाली नाहीत. स्मारकासभोवतालच्या सुमारे एक हजार राहिवाशांना अन्यत्र स्थलांतरीत करण्यासाठी पर्याय दिले आहेत. त्यातील २०० रहिवासी पर्यायी ठिकाणी जाण्यास तयार आहेत, त्यांच्याकडून स्थलांतराची कार्यवाही करावी. इतर रहिवाशांना टप्प्या टप्प्याने हलविण्याचे नियोजन करावे. तसेच येत्या १५ दिवसात भू संपादनची प्रक्रिया सुरु करावी.
अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, स्मारकाच्या विस्तारीकरणाची कामे सुरु करण्यात येत असून जे नागरिक तेथून पर्यायी जागेच्या ठिकाणी जाण्यास तयार आहेत, त्यांचे स्थलांतर पहिल्या टप्प्यात करुन त्यानंतर इतरांना स्थलांतरीत करावे.
पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर यांनी सद्य:स्थितीत सुरु असलेल्या कामांची माहिती दिली.
Editer sunil thorat





