लोणी काळभोर पोलीस ठाण्यात महिला हवालदार ललिता कानवडे यांचा निरोप समारंभ; डीसीपी राजकुमार शिंदे यांच्याकडून सन्मान, दोषसिद्धी दर वाढवण्यात मोलाची कामगिरी…

पुणे (हवेली) : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या महिला पोलीस हवालदार २१४८ ललिता सिताराम कानवडे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथे बदली झाल्याने त्यांचा निरोप समारंभ शनिवारी (दि. २३ ऑगस्ट २०२५) उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला परिमंडळ ५, पुणे शहरचे पोलीस उप आयुक्त मा. डॉ. राजकुमार शिंदे (भा.पो.से.) स्वतः उपस्थित राहिले. त्यांनी हवालदार कानवडे यांच्या कामगिरीचा गौरवोद्गार काढत त्यांचा विशेष सन्मान केला व पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, तसेच ठाण्यातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महिला पोलीस हवालदार २१४८ ललिता सिताराम कानवडे उल्लेखनीय कामगिरी…
हवालदार ललिता कानवडे गेल्या ४ वर्षांपासून लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या. त्यांनी पैरवी अंमलदार म्हणून सत्र न्यायालय, शिवाजीनगर, पुणे येथे खुन, आत्महत्येस प्रवृत्त करणे, हुंडाबळी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये प्रभावी पैरवी केली.
त्यांच्या कामकाजादरम्यान –
१५ गुन्ह्यांत दोषसिद्धी नोंदली गेली.
२६ आरोपींना शिक्षा झाली.
फक्त जानेवारी २०२५ ते एप्रिल २०२५ या ४ महिन्यांत ७ गंभीर गुन्ह्यांत दोषसिद्धी झाली.
फिर्यादी, साक्षीदार, मुद्देमाल व पुरावे न्यायालयासमोर नियोजित वेळेत सादर करण्याबरोबरच सरकारी अभियोक्त्यांना दोषसिद्धी मिळवून देण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी सहकार्य केले.
पोलिस दलाच्या प्रतिमेत भर…
त्यांच्या या प्रयत्नांमुळे पुणे शहरातील दोषसिद्धी दरात वाढ झाली असून, पोलीस दलाची प्रतिमा अधिक उंचावली आहे. त्यामुळे हवालदार ललिता कानवडे यांची कामगिरी उत्कृष्ट, उल्लेखनीय व गौरवास्पद ठरली आहे.
Editer sunil thorat





