अजितदादांची भर सभेत मागणी, अन् शरद पवारांनी ते झटक्यात मान्य केली…

पुणे (हडपसर) : पुण्यात आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पारितोषिक समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, बाळासाहेब थोरात, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील उपस्थित होते.
यावेळी अजितदादांनी शरद पवार यांच्या समोर एक मागणी केली. ती शरद पवार यांनी लगेच मान्य केली.
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून बक्षिसाची रक्कम दहा हजार दिली जाते. ती वाढवून एक लाख रूपये करावी, अशी मागणी अजितदादांनी केली. त्यावर संस्थेकडून दिले जाणारे बक्षिसाची रक्कम दहा हजार होती. आजपासून त्याची रक्कम वाढवून एक लाख रूपये केली जाईल, असं शरद पवार यांनी म्हटलं.
अजितदादा काय बोलले?
“उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना बक्षिसाची रक्कम दहा हजार रुपये दिली जाते. आज दहा हजारला फारशी किंमत उरलेली नाही. त्यामुळे ती रक्कम एक लाख रुपये करण्याची मी विनंती करतो. अर्थात वाढ कधी करायची याचा निर्णय शरद पवार घेतील,” असं अजितदादा म्हणाले.
यानंतर बोलताना शरद पवारांनी म्हटलं, “आतापर्यंत वैयक्तिक कामगिरीबद्दल संस्थेकडून पुरस्कारासाठी बक्षीस म्हणून १० हजारांची रक्कम दिली जात होती. आजपासून त्याची रक्कम वाढवून एक लाख रूपये केली जाईल. अंबालिका साखर कारखान्याला देण्यात येणाऱ्या पुरस्काराची रक्कम दोन लाख होती. ती आता पाच लाख रूपये असेल.”



