
संग्रहित फोटो
नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून विविध वर्गातील महिलांसाठी वेगवेगळ्या योजना चालवण्यात येत असतात. याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारने महिलांसाठी काही खास गुंतवणुकीच्या योजना सुरू केल्या आहेत.
तुम्ही विवाहित असाल तर तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता. आम्ही ज्या योजनेच्याबाबत बोलत आहोत ती योजना म्हणजे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र आहे. ही योजना केंद्र सरकारने २०२३ मध्ये सुरू केली होती.
केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांना आणि पात्र खाजगी क्षेत्रातील बँकांना महिला सन्मान बचत प्रमाणपत्र, २०२३ ची अंमलबजावणी करण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे, मुली/महिलांसाठीची ही योजना आता अधिक ठिकाणी सहजपणे उपलब्ध असेल. टपाल कार्यालयांसह पात्र शेड्यूल्ड बँकांमधूनही महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेचा लाभ घेता येईल.
कमीत कमी १०० रुपये आणि जास्तीत जास्त २ लाख
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत ठेवलेल्या ठेवीवर ७.५% वार्षिक दराने व्याज असेल ज्यात तिमाही चक्रवाढ होईल. त्यामुळे, प्रभावी व्याज दर अंदाजे ७.७ टक्के असेल. किमान १००० रुपये आणि १०० च्या पटीत २००,००० रुपयांच्या कमाल मर्यादेत कितीही रक्कम जमा केली जाऊ शकते.
या योजनेतील गुंतवणुकीची मॅच्युरिटी ही योजनेअंतर्गत खाते उघडल्याच्या तारखेपासून दोन वर्षांची असेल. या योजनेत केवळ गुंतवणुकीतच नव्हे तर योजनेच्या कालावधी दरम्यान आंशिक पैसे काढण्यासाठी देखील लवचिकता ठेवण्यात आली आहे. खातेदार योजनेच्या खात्यातील शिल्लकीच्या कमाल ४०% पर्यंत काढण्यास पात्र असेल.
२ लाख जमा करा आणि ३२ हजार व्याज मिळवा
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेच्या अंतर्गत तुम्ही २ लाख रुपये जमा केल्यास तुम्हाला या रक्कमेवर ७.५ टक्के दराने व्याज मिळेल. अशा प्रकारे मॅच्युरिटीच्या वेळीस तुम्हाला एकूण २,३२,०४४ रुपये मिळतील. म्हणजे तुम्ही २ लाख रुपये डिपॉझिट करुन तुम्हाला एकूण ३२,०४४ रुपये व्याज मिळेल.
महिलांच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी केंद्र सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून अनेक प्रयत्न केले आहेत. याच प्रयत्नांचे पुढचे पाऊल म्हणून, केंद्र सरकारने देशातल्या प्रत्येक मुलीला आणि महिलेला आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प २०२३-२४ मध्ये महिला सन्मान बचत प्रमाणपत्र, २०२३ योजना जाहीर केली. ही योजना सर्व मुली आणि महिलांना आकर्षक आणि सुरक्षित गुंतवणूक पर्याय प्रदान करते. या योजनेंतर्गत ३१ मार्च २०२५ रोजी किंवा दोन वर्षांच्या कालावधीसाठी खाते उघडले जाऊ शकते.



