पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्याचे उपायुक्तांचे आश्वासन..

पुणे (हडपसर) : पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करू लागली आहे. त्यावर विविध उपायोजना करण्याची गरज प्रवाशांकडून व्यक्त केली जात असल्याने त्याची दखल घेऊन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी महामार्गाची पाहणी करून उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले…
शेवाळेवाडी फाटा येथे यू-टर्न दिल्याने त्या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. वाडीत जाणाऱ्या किंवा बाहेर पडणाऱ्या नागरिकांना या कोंडीत अडकून पडावे लागत असते. शाळकरी विद्यार्थ्यांना येथून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे येथील माजी उपसरपंच राहुल शेवाळे यांनी वाहतूक पोलीस कार्यालयाकडे तक्रार करून उपाययोजना करण्याची मागणी केली होती.
दरम्यान, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त झेंडे यांनी आज परिस्थितीची पाहणी केली. शेवाळवाडी फाट्यावरील चौकात बस थांबल्यामुळे होणारी कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने तेथील बस डेपो व्यवस्थापकांशी थांबा हटविण्याबाबत चर्चा केली. दोन वाहतूक नियंत्रक पोलीस कर्मचारी देण्याचा आदेशही दिला आहे.
यावेळी माजी सरपंच पोपट कामठे , संजय कोद्रे, विजय कोद्रे, राजेंद्र घुले, अविनाश भंडारी, चंद्रकांत शेवाळे, मंगेश शेवाळे, तेजस कलाल, अक्षय थोरात, सिद्धार्थ शेवाळे, राम खेडेकर, रमेश कोद्रे, जावेद इनामदार, बबन कामठे आदी उपस्थित होते.
अमोल झेंडे
पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा.
“येथील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने पीएमपीएल बस डेपो व्यवस्थापकांशी शेवाळवाडी फाट्यावरील बस थांबा हलविण्याबाबत चर्चा केली आहे. फाट्यावरील चौकात दोन वाहतूक नियंत्रक पोलीस कर्मचारी नेमण्याचा आदेश दिला आहे. अतिक्रमणे हटविण्याबाबत पालिकेला पत्र दिले आहे. यूटर्न, पंक्चर व चौक रुंदीकरणाबाबत महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येईल. महामार्गावर प्रवासी घेण्यासाठी थांबणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स व इतर वाहनांवर वेळोवेळी कारवाई करण्यात येईल.




