स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज मोहीम! शिरूरमध्ये तीन ठिकाणी एकाच दिवशी कारवाई ; १२ किलो गांजा, सव्वातीन लाखांचा गुटखा जप्त, ४ आरोपी जेरबंद…

पुणे : दि. (२५ ते २६ जुलै २०२५) शिरूर पोलिस स्टेशन हद्दीत अवैध व्यवसाय करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तीन ठिकाणी धाडी टाकून तब्बल १२ किलो गांजा आणि ३.५६ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. या कारवायांमध्ये चार आरोपींना अटक करण्यात आली असून, सर्व गुन्ह्यांची नोंद शिरूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पहिली कारवाई – आमदाबाद फाट्यावर ४ किलो गांजासह दोघे अटकेत
२५ जुलै रोजी, स.पो.नि. कुलदीप संकपाळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शिरूर तालुक्यातील आमदाबाद फाटा येथे सापळा रचून दोघांना अटक केली. तपासणीदरम्यान त्यांच्या बॅगेतून ४ किलो १८५ ग्रॅम वजनाचा गांजा (किंमत सुमारे ₹८०,०००/-) सापडला.
अटक करण्यात आलेले आरोपी पुढीलप्रमाणे :
1. शुभम शंकर मोहीते (वय २९, रा. टाकळीहाजी)
2. विजय केमराज काळे (वय २९, रा. टाकळीहाजी)
त्यांच्यावर गु.र.नं. ५४२/२०२५, एनडीपीएस कायदा कलम ८(सी), २०(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, गांजासह मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
दुसरी कारवाई – बुरुड आळीतील फ्लॅटवर छापा, ₹३.५६ लाखांचा गुटखा जप्त…
त्याच दिवशी दुसऱ्या कारवाईत, स्थानिक गुन्हे शाखेला बुरूड आळी, शिरूर येथील गुलमोहर अपार्टमेंट मध्ये गुटख्याचा साठा असल्याची माहिती मिळाली. त्वरित कारवाई करत, पथकाने पहिल्या मजल्यावरील घरावर छापा टाकला. रफिक चाँद शेख (वय ३६, रा. गुलमोहर अपार्टमेंट, शिरूर) याच्या घरातून ३,५६,७८१/- रुपयांचा विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा, तंबाखू आणि पानमसाला जप्त करण्यात आला.
यावरून त्याच्यावर गु.र.नं. ५४३/२०२५, BNS कलम १२३, २७४, २७५, २२३ आणि अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ च्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिसरी कारवाई – मंगलमुर्ती नगरमध्ये ८ किलो गांजासह एकजण अटकेत…
२६ जुलै रोजी झालेल्या तिसऱ्या कारवाईत मंगलमुर्ती नगर, शिरूर येथून रमेश उर्फ रमन रामभाऊ खराडे (वय ३३, रा. कामाठीपुरा) यास अटक करण्यात आली. त्याच्या घरी केलेल्या छाप्यातून ८ किलो वजनाचा गांजा (किंमत ₹१,२०,०००/-) हस्तगत करण्यात आला.
सदर प्रकरणी आरोपीवर गु.र.नं. ५४४/२०२५, एनडीपीएस कायदा कलम ८(सी), २०(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यशस्वी कारवाईसाठी अधिकारी व पोलीस पथकाची मेहनत…
या तिन्ही कारवायांत पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांचे मार्गदर्शन लाभले. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरूर पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, स.पो.नि कुलदीप संकपाळ, स.पो.नि दिपक कारंडे, पो.स.ई दिलीप पवार, पो.स.ई सागर शेळके, पो.ह. तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजू मोमीन, नाथसाहेब जगताप, नितीन सुद्रीक, भाग्यश्री जाधव, सागर धुमाळ, सचिन भोई आदींचा या कारवायांमध्ये मोलाचा सहभाग होता.
शिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा जोरदार हल्ला!
ही सलग तीन कारवायांची यशस्वी मालिका शिरूर परिसरातील अवैध धंद्यांना दिलेला मोठा दणका मानली जात आहे. या मोहिमेमुळे परिसरातील नागरिकांत समाधानाची भावना असून, पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Editer sunil thorat




