“मुलाकडून मूल होणार नाही, माझ्याशी संबंध ठेव” – निवृत्त पोलिस अधिकाऱ्याचा सुनेला घृणास्पद प्रस्ताव
पुण्यातील सहकारनगरमध्ये संतापजनक घटना : माजी सहाय्यक पोलिस आयुक्ताकडून सुनेवर बळजबरीचा प्रयत्न..

पुणे : पुणे शहरातील सहकारनगर परिसरात सासरा–सुनेच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिस खात्यात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून सेवा केलेल्या निवृत्त अधिकाऱ्याने आपल्या सुनेवरच बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. या घृणास्पद घटनेमुळे पुणेकरांमध्ये संताप व्यक्त होत असून, आरोपी सासऱ्यासह त्याची पत्नी व मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
—
लग्नापूर्वी लपवली मोठी गोष्ट
३० वर्षीय पीडित महिलेचा महिन्याभरापूर्वी आरोपी अधिकाऱ्याच्या मुलाशी विवाह झाला होता. मात्र पती अपत्यप्राप्ती करण्यात असमर्थ असल्याची बाब कुटुंबाला माहित असूनही त्यांनी ती लपवली. पीडितेला या गोष्टीची कल्पनाही देण्यात आली नव्हती.
—
सासऱ्याचा घृणास्पद प्रस्ताव
लग्नानंतर एका दिवशी निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्ताने सुनेच्या खोलीत प्रवेश करून तिला धक्कादायक प्रस्ताव दिला. “तुझ्या नवऱ्याकडून तुला मूल होणार नाही. त्यामुळे तुला माझ्याकडूनच या गोष्टी कराव्या लागतील,” असे लज्जास्पद वक्तव्य करत त्याने बळजबरीचा प्रयत्न केला.
हे ऐकताच पीडित महिलेच्या पायाखालची जमीन सरकली. तिने धैर्य एकवटून आरोपीपासून स्वत:ची सुटका करून घेतली आणि थेट पोलिस स्टेशनचा मार्ग धरला.
—
पोलिसांकडे तक्रार, गुन्हा दाखल
पीडितेने पोलिसांना संपूर्ण घटना सांगितली. या धक्कादायक खुलाशानंतर सहकारनगर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त, त्याची पत्नी व पीडितेचा पती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सदर गुन्हा दाखल होताच पोलिस वर्तुळातही खळबळ उडाली आहे. कधीकाळी कायद्याचे रक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यानेच असा प्रकार घडवून आणल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.
—
समाजातील संताप
पोलिस खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्याने केलेला हा प्रकार समाजात चर्चा व संतापाचा विषय ठरला आहे. पोलिस खात्याच्या प्रतिमेलाही या घटनेमुळे धक्का बसला आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी काम करणाऱ्या संघटनांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पुढील तपास
सहकारनगर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपीविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
Editer Sunil thorat



