डॉ गजानन टिंगरे
पुणे (इंदापुर) : राज्याचे नवीन क्रीडा मंत्री आणि इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी प्रयत्न करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन मंडळामधून दोन वर्षात सुमारे 3 कोटी 78 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून देत उजनी धरणात मस्त्यबीज सोडण्याचा अभिनव उपक्रम केला.
परिणामस्वरूप उजनी धरणात मोठ्या प्रमाणात मासे उपलब्ध होत असल्याने उजनी काठावरील मच्छीमारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दररोज अगोदरपेक्षा दुप्पट मासे मिळत असल्याने या मच्छिमारांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होत आहे. त्यामुळे उजनी काठावरील मच्छीमाराना अच्छे दिन आले असल्याचं खुद्द मच्छीमार सांगत आहेत.
उजनी काठावरील एकट्या इंदापूर तालुक्यातील भिगवणपासून उजनी धरणापर्यंत काठावरील इंदापूर तालुक्यातील खानोटा, डिकसळ, मदनवाडी, डाळज, पळसदेव, शेलारपट्टा, भावडी, चांडगाव, काळाशी, गंगावळण, अगोती इत्यादींसह सुमारे वीस ते पंचवीस गावासह अहमदनगर जिल्ह्यातील पंधरा ते वीस गावातील नागरिकांना मासेमारीतून रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यामुळे उजनी काठावरील सुमारे चाळीस ते पन्नास गावांतील मच्छीमाराना रोजगार मिळाला आहे. पूर्वी उजनीत मत्स्यबीज सोडण्याचा उपक्रम क्वचितच केला जात होता. त्यामुळे उजनीत अगदी मासे मिळेनासे झाले होते. उजनीत मासे मिळत नसल्याने मच्छीमारांना मासेमारी सोडून इतर व्यवसाय करण्याची वेळ आली होती. तर अनेकांनी मासेमारी सोडून रोजगारासाठी इतर ठिकाणी स्थलांतर केलं होत. शिवाय उजनीतील अनेक माशांच्या जाती अगदी नष्ट होण्याच्या मार्गावर होत्या. अशात मंत्री भरणे यांचा निर्णय उजनी धरणात मत्स्यबीज सोडण्याचा उपक्रम मच्छिमारांसाठी आर्थिक सुबत्ता देणारा ठरला आहे. उजनीत मत्स्यबीज सोडल्याने दोन वर्षात उजनीचे चित्रच बदलून गेलं आहे.
सध्या मच्छीमार किमान ४० ते ५० किलो मासे मार्केटला विक्रीसाठी आणत आहे. यामध्ये एक ते दिड किलोपर्यंत रोहू, कटला मासा विक्रीला आणत आहेत. एकंदरीत मच्छीमारांना सध्या पूर्वीपेक्षा दुप्पट मासे विक्रीसाठी आणत आहेत. उजनीत मोठ्या प्रमाणात मासे मिळत असल्याने अनेक स्थलांतरित मच्छीमार परत उजनीकडे वळले आहेत. शिवाय दररोज हजारो रुपये मासेमारी व्यवसायातून मिळत आसल्याने, मच्छीमारांमध्ये आर्थिक सुबत्ता आली आहे. तालुक्यासह इतर भागातील अनेक नागरिक उजनी काठावर येऊन स्थायिक होऊन मासेमारी करून उपजीविका चालवत आहेत.
दरवर्षी मत्स्यबीज सोडावे
मच्छीमारांना मोठ्या प्रमाणात मासे मिळत असल्याने तालुक्यातील भिगवण व इंदापूर येथील बाजारपेठेतील व्यापार्यांना देखील मोठ्या प्रमाणात मासे उपलब्ध होत असल्याने व्यापार्यांना देखील सुगीचे दिवस आले आहेत. या पुढे देखील दरवर्षी उजनी धरणात विविध जातीचे मत्स्यबीज शासनाच्या वतीने उजनी धरणात मत्स्यबीज सोडल्यास हजारो नागरीकांना यातून रोजगार प्राप्त होणार असल्याचं मत मच्छीमार व व्यापारी व्यक्त करत आहेत.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा