
पुणे : सिल्वर स्प्रिंग चॅरिटेबल फाउंडेशन संचलित विद्याश्रम शाळा वारजे पुणे या विद्यालयात आज शनिवार दिनांक २२/०२/२०२५ रोजी स्काऊट गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल व लेडी बेडन पॉवेल यांचा जन्मदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
हा दिवस संपूर्ण जगात स्काऊट गाईड चिंतन दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त विद्यालयात चर्चासत्र, निबंध व चित्रकला स्पर्धा घेण्यात आली, तसेच दोरीच्या गाठींचे प्रकार, तंबू बांधणे काठीचे ट्रायपॉड करणे इत्यादीची प्रात्यक्षिके करण्यात आली. वारजे माळवाडी परिसरामध्ये स्काऊट गाईड सुरू करणारी विद्याश्रम शाळा ही पहिली शाळा आहे. शाळेमध्ये स्काऊट गाईड सुरू करण्यासाठी संस्थेचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी ॲड.किशोर रासकर यांचे मार्गदर्शन लाभले आणि संस्थापक अध्यक्ष डॉक्टर परिमला सुब्रमण्यम यांचे सहकार्य लाभले.
यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सविता मोरे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या शुभ दिनी कार्यक्रमाची सुरुवात स्काऊट गाईड प्रार्थनेने करण्यात आली विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व उपस्थित सर्व मान्यवर यांच्या हस्ते सरस्वती पूजन व लॉर्ड बेडन पॉवेल व लेडी बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्काऊट प्रमुख वैभव पाठक व गाईड प्रमुख संतोषी सिद्धू यांनी केले सहभागी विद्यार्थ्यांनी आपले अनुभवाचे बोल व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ शितल भोईटे यांनी केले आभार प्रदर्शन सौ ममता सिंग यांनी केले अशा प्रकारे शैक्षणिक व उत्साहवर्धक वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.



