गावठी हातभट्टीची दारू विक्री करणार्यास अटक ; लोणी काळभोर
कारवाईत पोलिसांना २ लाख ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त

पुणे (हवेली) : गावठी हातभट्टीची दारू विक्री करण्यासाठी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून निघालेल्या एकाला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे.
या कारवाईत पोलिसांना २ लाख ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर कारवाई हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील बारा फाटा येथे गुरुवार (२० फेब्रुवारी) रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास करण्यात आली आहे. यामध्ये मुबारक जाफर गड्डे (वय ४३, रा. पाषाणकर बाग, लोणी काळभोर, ता.हवेली) याला अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी पोलीस अंमलदार राहुल कर्डिले यांनी सरकारच्या वतीने फिर्याद दिली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस अंमलदार राहुल कर्डिले हे नेहमीप्रमाणे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास गस्त घालत असताना त्यांना एका खबऱ्यामार्फत पुणे-सोलापूर महामार्गावरून अवैधरित्या गावठी हातभट्टी दारूची वाहतूक चारचाकी गाडीतून होणार आहे, अशी माहिती मिळाली होती.
मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील बारा फाटा परिसरात सापळा रचला. तेव्हा पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून पुण्याच्या दिशेने जाणारी एक चारचाकी मारुती सुझुकी कंपनीची अल्टो कार क्रमांक एमएच १२ एसएल ६९२८ आली. तिला अडवून तपासणीएका खबऱ्यामार्फत केली असता गाडीमध्ये प्लास्टिकच्या ८ कॅनमध्ये भरलेली २८० लीटर हातभट्टी गावठी दारु मिळून आली. पोलिसांनी अल्टो कारसह गावठी हातभट्टीची दारू असा सुमारे २ लाख ७८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. मुबारक गड्डे याला अटक करून त्यांच्याविरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमन कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल जाधव, प्रदीप गाडे, पोलिस अंमलदार राहुल कर्डिले व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.



