
पुणे : राज्यशासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यातील १ वर्ष ते १५ वर्षाखालील बालकांना मार्च २०२५ पासून जपानीज एन्सेफलायटीस लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून सर्व संबंधित विभागांनी समन्वय राखून लसीकरण मोहीम यशस्वी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील ११ लाख ६१ हजार ३३१ इतक्या बालकांना लस दिली जाणार आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.
या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत जितेंद्र डूडी म्हणाले, जॅपनीज एन्सेफलायटीस हा आजार १५ वर्षाखालील बालकांमध्ये आढळून येतो. आशिया खंडात ॲक्यूट एन्सेफलायटीस सिंड्रोममुळे हा आजार होतो. या आजारात सुमारे ७० टक्के रुग्ण मृत्यूमुखी पडतात किंवा त्या रुग्णांमध्ये दीर्घकालीन न्युरोलॉजीकल अक्षमता आढळून येतात.
सर्व अंगणवाडी केंद्र, खाजगी व शासकीय शाळा अंतर्गत १ वर्ष ते १५ वर्षाखालील सर्व बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग आणि शालेय शिक्षण विभागाचा (माध्यमिक व प्राथमिक) यांच्या सयुक्त विद्यमाने ही लसीकरण मोहीम आयोजित करण्यात येणार आहे.
लसीकरणाकरीता ३ हजार ७२८ एवढे लसीकरण सत्र आयोजित करण्यात येणार असून एकूण ५७४ लस टोचकद्वारे लस दिली जाणार आहेत. याकरीता एकूण ६२९ पथके तयार करण्यात आले असून यामध्ये ३ हजार ९६० आशा कार्यकर्त्या, ४ हजार ७६१ अंगणवाडी सेविका व ७ हजार ३९५ शिक्षक तसेच १६८ पर्यवेक्षकांची निवड करण्यात आली आहे, असेही जितेंद्र डूडी म्हणाले.



