कारागृहातील टेंडर प्रकरणी ! तत्कालीन अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांचे स्पष्टीकरण..

पुणे : स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी राज्यातील कारागृहात तत्कालीन अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta IPS) आणि पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर (Dr.Jalinder Supekar IPS) यांच्या काळात ५०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता.
त्यावर स्पष्टीकरण देताना अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी सांगितले की, या प्रकरणाशी आपला काही संबंध नाही. आपली बदली झाल्यानंतर ही टेंडर प्रक्रिया झाली आहे.
राजू शेट्टी यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील कारागृहात रेशन आणि उपाहारगृहामधून कैद्यांसाठी घेतले जाणारे धान्य व अन्य वस्तूंचे खुल्या बाजारात असलेल्या दरांपेक्षा दुप्पट ते तिप्पट किंमतीला खरेदी करण्यात आले. तसेच विद्युत उपकरणेही अव्वाच्या सव्वा किंमतीला खरेदी करण्यात आले आहे. ही टेंडर प्रक्रिया २०२४ ते २०२५ मधील आहेत. त्यातील विद्युत उपकरण खरेदीत बाजारभावापेक्षा १०२ कोटी रुपये अधिक मोजण्यात आले असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. राजू शेट्टी यांनी हा ५०० कोटी रुपयांचा घोटाळा अमिताभ गुप्ता आणि पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्या कार्यकाळात घडला असल्याचे म्हटले असून त्याच्या चौकशीची मागणी केली आहे.
याबाबत अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी सांगितले की, ही टेंडर प्रक्रिया आपली बदली झाल्यानंतर राबविण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्याशी आपला काही संबंध नाही.
अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांची पुणे पोलीस आयुक्तपदावरुन १५ डिसेंबर २०२२ मध्ये कारागृह महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली होती. तेथे जवळपास दोन वर्षे काम केल्यानंतर त्यांची जुलै २०२४ मध्ये मुंबई येथे बदली करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची ८ ऑक्टोंबर २०२४ रोजी प्रतिनियुक्तीवर इंडो तिबेट बॉर्डर पोलीसच्या पोलीस महानिरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.



