बी. जे. मेडिकल कॉलेजच्या दोन लाचखोर अधिकाऱ्यांना एसीबीकडून बेड्या…ससून परिसरातील घटना…

पुणे : बीजे मेडिकल कॉलेज मधील दोन लाचखोर अधिकाऱ्यांना एक लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई ससून रुग्णालय परिसरात असलेल्या बी. जे. मेडिकल कॉलेज मधील कार्यालयात बुधवारी संध्याकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान करण्यात आली.
यामध्ये वरिष्ठ सहाय्यक आणि कार्यालयीन अधीक्षकाचा समावेश असल्याचे एसीबीचे अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी सांगितले.
वरिष्ठ सहाय्यक जयंत पर्वत चौधरी (४९) आणि कार्यालयीन अधीक्षक सुरेश विश्वनाथ बोनवळे (५३) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एसीबी कडे ३२ वर्षीय व्यावसायिकाने तक्रार दिली आहे. एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचा फर्निचरचा व्यवसाय आहे. त्यांनी बी. जे. मेडिकल कॉलेजला फर्निचरचा पुरवठा केलेला होता. त्याचे २० लाख रुपये बिल झालेले होते.
यातील दहा लाख रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी १३ टक्के प्रमाणे एक लाख ३० हजार रुपयांची लाच त्यांच्याकडे मागण्यात आली. तडजोडीअंती एक लाख रुपये लाच स्वीकारण्यास आरोपी तयार झाले. दरम्यान, तक्रारदार यांना लाच द्यायची नसल्यामुळे त्यांनी एसीबीकडे या संदर्भात तक्रार दाखल केली. या तक्रारीची पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यानंतर ससून परिसरात बी.जे. मेडिकल कॉलेजमधील कार्यालयात सापळा रचण्यात आला. एक लाख रुपयांची लाच घेताना चौधरी आणि बोनवळे या दोघांना रंगेहात पकडण्यात आले. या दोघांच्या घराची झडती घेण्याचे काम सुरू असून पुढील तपास एसीबीकडून सुरू आहे.



