
संपादक सुनिल थोरात
पुणे ( हडपसर) : विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाण निर्माण व्हावी या उद्देशाने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
यामध्ये प्लास्टिक कलेक्शन व हस्तांतरण, पर्यावरण विषयी फिल्म व त्यावर चर्चा श, वृक्षारोपण अशा विविध उपक्रमांचा समावेश होता. या कार्यक्रमासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य मा. डॉ. देविदास वायदंडे उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे, उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, प्रा. अनिल जगताप, डॉ. सविता कुलकर्णी, डॉ. दत्तात्रय संकपाळ उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पर्यावरण दिन साजरा करण्याची गरज आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वाची असल्याने हा उपक्रम साजरा केल्याचे डॉ. सविता कुलकर्णी यांनी सांगितले. डॉ. देविदास वायदंडे यांनी पर्यावरण हा आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि त्याची काळजी घेण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. महाविद्यालयाने असा उपक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांनी महाविद्यालयाचे कौतुक केले. डॉ. नितीन घोरपडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी याविषयी जागृत होणे गरजेचे असल्याचे सांगितले. सध्या तापमान वाढ, पूर येणे, दरडी कोसळणे असे अनेक परिणाम आपल्याला दिसतात. याचे कारण पर्यावरणाचे असंतुलन असून दिवसेंदिवस याची गंभीरता वाढत चालली असल्याचे त्यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी याविषयी आपले मत व्यक्त करावे या उद्देशाने Wounded hills, The salt in the veins या दोन फिल्म विद्यार्थ्यांना यावेळी दाखवण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी याविषयी आपली मते व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सविता कुलकर्णी यांनी तर आभार डॉक्टर दत्तात्रय संकपाळ यांनी मांडले.
यावेळी महाविद्यालयातील शिक्षकांच्या उपस्थितीत महाविद्यालयात जमा झालेले २१ किलो प्लॅस्टिक सागर मित्र या संस्थेला सुपूर्द करण्यात आले. तसेच पर्यावरण दिनाचे औचित्य साधून डॉ. देविदास वायदंडे यांच्या शुभहस्ते महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.





