
संपादक सुनिल थोरात
पुणे (हवेली) : पुर्व हवेलीत वाढते वसाहतीकरण आणि औद्योगिकरण, यासाठी मोठ्या प्रमाणात होत असलेली जंगलतोड आणि मानवनिर्मित वणव्यांमुळे वनांचा र्हास होत असल्याने पक्षांचा अधिवास नष्ट होत आहे.
त्यामुळे पक्षांचे अस्तित्वच नष्ट होण्याची शक्यता आहे. पक्षांचे अस्तित्व टिकवण्यासाठी तसेच मानवी वस्तीत येणार्या पक्षांच्या दाण्यापाण्याची व राहण्याची व्यवस्था करणे काळाची गरज आहे. असे मत पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सिताराम गवळी यांनी व्यक्त केले.
शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या जयंतीनिमित्त स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर व ग्रीन फौंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने पक्षांना घरटी तसेच धान्य पाणी उपक्रम राबविण्यात आला. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी यावेळी विविध विकास सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन विठ्ठल काळभोर, ग्रीन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप, ग्रीन तालुका अध्यक्ष गणेश काळभोर, शिवभक्त मुरलीधर गुजर, पैलवान नवनाथ काळभोर व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. सद्यस्थितीत इमारती, घरे, फ्लॅटच्या गॅलरी, लोखंडी पाईप, खिडक्या, पडक्या इमारती व पार्किंग अशा मिळेल त्या ठिकाणी पक्षी घरटे बांधून आपले अस्तित्व टिकविण्यासाठी झगडताना दिसत आहेत. पक्षांच्या विणीचा हंगाम सुरू होत आहे म्हणून ते घरटे बांधण्यासाठी सुरक्षित जागा शोधताना दिसत आहेत. हे लक्षात येताच ग्रीन फौंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष अमित जगताप यांनी त्यांच्या सुरक्षित निवार्याची व्यवस्था करण्याचे ठरविले. याबाबत त्यांनी अजित साळुंखे यांचेशी चर्चा केली.
ही घरटी बनवण्यासाठी टाकाऊ वस्तूंचा उपयोग करण्याचे ठरवले. त्यांनी खाऊच्या बरण्या जमा केल्या. आणि पूर्णतः टाकाऊ वस्तू पासून उत्तम अशी अनेक घरटी तयार केली. व ती आज हायस्कूल मधील झाडावर लावण्यात आली आहेत. काही दिवसांत ही घरटी गावात ठिकठिकाणी लावण्यात येणार आहेत. यामुळे पक्षांना हक्काचे घर व दानापाणी मिळणार आहे.
अमित जगताप (संस्थापक, अध्यक्ष – ग्रीन फौंडेशन महाराष्ट्र राज्य.)
विणीच्या हंगामात पक्षी घरटी बांधण्यासाठी मनुष्य वस्तीचा शोध घेत असतात. अशा पक्षांना हक्काचे आणि सुरक्षित घर मिळावे म्हणून ही सर्व धडपड चालू आहे. तयार झालेले पर्यावरण स्नेही घरटी पाहून अनेक निसर्गप्रेमी लोक सुद्धा ती बनविण्यासाठी पुढाकार घेत आहेत.



