जिल्हासामाजिक

मोजणी कार्यालयाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात शेतकऱ्याच्या कुटुंबाचा आमरण उपोषणाचा लढा ; मुळशी…

संपादक सुनिल थोरात

पुणे (मुळशी) : (ता.९) प्रशासनाच्या वतीने “महसूल अदालत” हा कार्यक्रम पुणे जिल्ह्यामध्ये नागरिकांच्या सोयीसाठी राबविण्यात येत आहे. यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी सर्वसामान्य नागरिकांची रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिले असून ते स्वतः आज सोमवारी (ता.९) पुण्यात उपस्थित राहून आढावा घेत आहेत. मात्र दुसरीकडे मुळशी तालुक्यात मोजणी कार्यालयातून न्याय मिळत नसल्याने एका शेतकऱ्याच्या कुटुंबाला उपोषण करण्याची वेळ आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

मुळशी तालुका मोजणी कार्यालयाचे उपअधिक्षक स्वप्ना पाटील यांच्या भूमी अभिलेख विभागाकडून मोजणी प्रकरणात योग्य न्याय मिळत नाही. सन २००६ साली कोर्ट कमिशनर मोजणीत हद्दी खुणा कायम झालेल्या आहेत. एकाच गट नंबरमध्ये वेगवेगळे मोजणी नकाशे तयार होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये वाद लावून देण्याचे काम मोजणी कार्यालय करत आहे. असा आरोप लवळे (राऊतवाडी, ता. मुळशी) येथील शेतकरी अरुण भिकोबा राऊत यांनी केला आहे. मोजणी कार्यालयाच्या चुकीच्या कारभाराच्या निषेधार्थ शेतकरी अरुण राऊत हे मुळशी तहसील कार्यालयासमोर आज सोमवारीपासून (ता.९) आमरण उपोषणास बसले आहेत. त्यावेळी बोलताना वरील आरोप लवळे यांनी केला आहे.

मुळशी तालुक्यातील मोजणी कार्यालयाच्या गलथान कारभारामुळे शेतकरी अरुण राऊत यांना वडिलोपार्जित घर गमावण्याची वेळ आली आहे. कोर्ट कमिशनर यांनी मोजणी केलेली असतानाच तसेच मोजणी कार्यालयाच्या मूळ रेकॉर्डकडे दुर्लक्ष करून, लगतधारक शेतकरी व मोजणी कार्यालयाच्या संगनमताने गटाची हद्द चुकीची दाखवल्याचा आरोप लवळे या शेतकरी अरुण राऊत यांनी केला आहे.

या संदर्भात मु.पो. लवळे, राऊतवाडी (ता. मुळशी) येथे गट नंबर, ४१३ मध्ये तक्रारदार अरुण राऊत यांची वडिलोपार्जित शेती आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच गटात त्यांचे घर आहे. गट नंबर ४१३ व गट नंबर ४३० या गटाचा बांध हा पुर्व पश्चिम दिशेला सरळ आहे. त्याची नोंद ही शासकीय दफ्तरी नकाशात नमूद आहे. सन २००६ साली झालेल्या कोर्ट कमिशनर मोजणीतही हद्द व खुणा कायम झालेल्या आहेत. मात्र हे अभिलेख रेकॉर्ड डावलून मोजणी कार्यालय मुळशी हे गट नबंर ४१३ व गट नंबर ४३० चा बांध हा नकाशात सरळ असतानाही तिरकस दाखवत आहे.

मोजणी कार्यालय मुळशीच्या या गलथान कारभारामुळे गट नंबर ४१३ येथे चाळीस वर्षापासूनचे रहाते घर हे शेजारील गट नंबर ४३० मध्ये दाखवत आहे.

लगतधारक व मोजणी कार्यालयातील भूकरमापक व अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे शासकीय दफ्तर व रेकॉर्ड डावलून चुकीच्या मोजणीच्या हद्दी खुणा दाखवण्याचे काम मोजणी कार्यालय करत असल्याचा आरोप राऊत यांनी बोलताना केला आहे. या दरम्यान, शेतकरी राऊत यांची मागणी नसताना परस्पर त्यांचे मोजणीचे प्रकरण भोर उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडे वर्ग केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे मुळशी भूमी अभिलेख विभागातील कारभार प्रकाशझोतात आला आहे.

अरुण राऊत, शेतकरी.

सन २००६ साली कोर्ट कमिशनर मोजणी झालेली आहे. त्यानुसार हद्दी कायम आहेत. मात्र लगतधारक व मोजणी कार्यालय संगनमताने मोजणीचे मूळ रेकॉर्ड बदलायला निघाले आहेत. मुळशी मोजणी कार्यालयाचा मनमानी कारभार सुरू आहे. त्यामुळे माझे प्रकरण मुद्दामहून भोर तालुका मोजणी कार्यालयाकडे वर्ग केले आहे. २००६ साली झालेल्या मोजणीचे रेकॉर्ड भोरचे उपअधिक्षक विकास गोफणे यांना दिलेले आहे. प्रशासनाकडून आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत मी व माझे कुंटूब आमरण उपोषणाला बसणार आहे.

शेतकरी अरुण राऊत यांची मुळशी भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांविषयी तक्रार होती.

स्वप्ना पाटील (उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय मुळशी)

त्यामुळे वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार त्यांचे प्रकरण भोर ला वर्ग केले आहे. नियमानुसार त्या प्रकरणात योग्य ती कारवाई भोर तालुका मोजणी कार्यालयाकडून होईल. तसेच संबंधित प्रकरण हे माझ्याकडे नसल्याने त्याबाबत बोलणे उचित ठरणार नाही.

विकास गोफणे (उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय भोर)

मोजणी कर्मचाऱ्यांचा संप मिटल्यामुळे लवळे राऊतवाडी येथील मोजणी प्रकरणात १६ जून ला हद्दी खुणा दाखवण्यात येणार आहे. त्याबाबतची नोटीस संबंधित शेतकऱ्यांना पाठवली आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??