जिल्हामहाराष्ट्रसामाजिक
भूमी अभिलेख विभागात नियमांचा फज्जा ! पुण्यात दोन अधिकाऱ्यांच्या मुदतपूर्व बदल्यांवर वादंग..

पुणे : मुदतपूर्व बदल्या केल्या जाणार नसल्याची महागर्जना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती. मात्र याला बगल देत पुणे जिल्हा अधीक्षक प्रभाकर मुसळे व हवेली उपअधिक्षक विकास गोफणे यांना मुदतपूर्व बदल्यांची जणू लॉटरी लागली असल्याची चर्चा होत आहे.
राज्यभरातील भूमी अभिलेखचे उपअधीक्षक व जिल्हा अधीक्षक यांच्या नियमित बदल्या अद्याप प्रलंबित असताना पुण्यात मुदतपूर्वचा अधिकचा लाभांश फक्त दोन लाभार्थी अधिका-यांना मिळाल्याचा प्रकार समोर आल्याची घटना घडली आहे. या मुदतपूर्व बदल्यांसाठी मुख्यमंत्री कार्यालयाची कोणतीही परवानगी न घेतल्याचा आरोप होत असून बदल्यांमागील प्रोटोकॉलच्या आकड्यांची जोरदार चर्चा भूमि अभिलेख विभागात रंगली असल्याची चर्चा आहे.
पुणे जिल्हा भूमी अभिलेखचे तत्कालीन जिल्हा अधीक्षक सुर्यकांत मोरे यांची चौकशी व उपसंचालकपदी पदोन्नती तसेच हवेलीचे तत्कालीन उपअधिक्षक अमर पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होऊन निलंबन झाले आहे. त्यामुळे भूमी अभिलेखच्या पुण्यामधील भ्रष्ट्र कारभारावरून संपूर्ण राज्यभर आरोपांची राळ उडाली होती. त्यातच हवेलीचे उपअधिक्षक गोफणे व पुणे जिल्हा अधीक्षक मुसळे यांच्या मुदतपूर्व नियुक्तीच्या बदली प्रक्रियेवरुन नागरिकांमध्ये संभ्रम व “प्रोटोकॉलची” चर्चा रंगली आहे.
भूमि अभिलेखमधील मुदतपूर्व बदल्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
जलसंपदा विभागातील बदल्याबद्दल तक्रारी झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या बदल्यांना नुकतीच स्थगिती दिली आहे. एकीकडे राज्यभरातील भूमी अभिलेख विभागातील उपअधीक्षक व जिल्हा अधीक्षक यांच्या नियमित बदल्या रखडल्याने ते सर्वजण वेटींगवर थांबले आहेत. मात्र दुसरीकडे मुदतपूर्व बदलीच्या माध्यमातून हवेली उपअधीक्षक पदी व पुणे जिल्हा अधीक्षक पदी नियुक्ती झाली आहे. त्यामुळे या मुदतपुर्वच्या गोंधळाबाबत एका वजनदार मंत्र्याने थेट याबाबतची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यामुळे या बदल्यांनाही स्थगिती मिळणार का ? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
उपअधीक्षक गोफणे यांची “भोर” मधून एका वर्षाच्या आत हवेलीत बदली…
उपअधीक्षक विकास गोफणे यांनी पुरंदर तालुक्यात चार वर्षाचा कार्यकाल पूर्ण केलेला आहे. त्यानंतर त्यांची पुरंदर मधून भोर तालुका उपअधिक्षक म्हणून बदली झाली होती. भोरमध्ये त्यांचा तीन वर्षांचा कालावधी पूर्ण होण्याच्या अगोदरच जवळपास एक वर्षाच्या आतच त्यांची हवेली भूमी अभिलेख कार्यालय उप अधिक्षक पदी नियुक्ती झाली आहे.
जिल्हा अधीक्षक प्रभाकर मुसळे यांच्या मुदतपूर्व बदलीमुळे शासकीय नियमांचा बागुलबुवा…
जिल्हा अधीक्षक प्रभाकर मुसळे यांची आक्टोंबर २०२३ मध्ये भूमि अभिलेख संलग्न उप संचालक भूमि अभिलेख, नागपूर प्रदेश, नागपूर, गट-अ यांच्या सेवा, त्यांचा नागपूर विभाग हा मूळ महसुली विभाग कायम ठेवूनच, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभावित क्षेत्र (नैना) प्रकल्प सिडको येथे नवी मुंबई येथे बदली झाली होती. त्यांच्या आस्थापनेवरील जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, गट-अ या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती तीन वर्षांच्या कालावधीकरीता नगर विकास विभागाकडे सुपूर्द करण्यात आले होते. मात्र त्याठिकाणीही तीन वर्षांचा कालावधी पूर्ण होण्याच्या अगोदरच मुसळे यांची पुणे जिल्हा अधीक्षक पदी नियुक्ती झाली आहे. त्यामुळे या मुदतपूर्व बदल्यामुळे शासकीय नियमांचा ‘बागुलबुवा’ झाला आहे.
मुख्य संपादक सुनिल थोरात



