डॉ. सागर तांबे यांना दक्षिण कोरियातील आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘बेस्ट प्रेझेंटेशन पेपर पुरस्कार’…
एमआयटी-एडीटी विद्यापीठाची जागतिक पातळीवरील झळाळी; भारताच्या शैक्षणिक उपस्थितीला मोठा सन्मान...

पुणे/उल्सान (दक्षिण कोरिया) : पुण्यातील एमआयटी-एडीटी विद्यापीठाच्या संगणक अभियांत्रिकी विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. सागर तांबे यांनी दक्षिण कोरियातील युनिव्हर्सिटी ऑफ उल्सान येथे झालेल्या १७व्या इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन ह्युमन सिस्टम इंटरॅक्शन (IEEE HSI 2025) मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरी बजावली. त्यांच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळत ‘बेस्ट प्रेझेंटेशन पेपर’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
सत्राध्यक्ष आणि संशोधक म्हणून दुहेरी भूमिका…
एमआयटी-एडीटी विद्यापीठाच्या इंटरनॅशनल रिलेशन्स सेलचे सदस्य म्हणून डॉ. तांबे यांनी “वास्तविक जगात सहाय्यक तंत्रज्ञानाची प्रगती” या विषयावर सत्राध्यक्षाची भूमिका निभावली. त्यांनी परिषदेत महत्त्वपूर्ण तांत्रिक संशोधन सादर करून केवळ भारताचीच नव्हे तर आपल्या विद्यापीठाचीही प्रतिष्ठा उंचावली.
संशोधनातून तांत्रिक प्रगतीस हातभार…
डॉ. तांबे यांनी डॉ. जयश्री प्रसाद आणि डॉ. रजनीशकौर सचदेव यांच्या सहलेखनातून “वायरलेस बॉडी सेन्सर नेटवर्कचे तुलनात्मक विश्लेषण: ओएमएनईटी++, कॅस्टालीया, एनएस३ए” हे संशोधनपत्र सादर केले.
या संशोधनात वायरलेस बॉडी सेन्सर नेटवर्क्स (WBSNs) साठी विविध सिम्युलेशन टूल्सचे तुलनात्मक विश्लेषण करण्यात आले असून, हे मानवी-केंद्रित वायरलेस प्रणालींच्या संशोधक आणि तांत्रिक तज्ज्ञांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ह्या उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल परिषदेत त्यांना ‘बेस्ट प्रेझेंटेशन पेपर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जागतिक सहकार्याच्या संधी खुल्या…
या परिषदेदरम्यान डॉ. तांबे यांनी विविध देशांतील प्राध्यापक आणि संशोधकांशी संवाद साधत संयुक्त संशोधन प्रकल्प, विद्यार्थी-प्राध्यापक देवाण-घेवाण कार्यक्रम, उद्योग-विद्यापीठ सहकार्य आणि तांत्रिक हस्तांतरण यांसारख्या महत्त्वपूर्ण संधींसाठी मार्ग मोकळा केला.
विद्यापीठाचा अभिमान…
या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल माईर्स एमआयटी शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा प्र-कुलपती डॉ. मंगेश कराड, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, संचालक डॉ. विपुल दलाल, अधिष्ठाता डॉ. रजनीकौर सचदेव-बेदी आणि डॉ. रेखा सुगंधी यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
Editer sunil thorat





