जिल्हामहाराष्ट्रराजकीय
देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू रवींद्र चव्हाण भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष! मुंबईत पक्षाकडून अधिकृत घोषणा; संघटनेच्या मजबुतीसाठी जबाबदारी…
भाजप प्रदेशाध्यक्षपदी मोठा बदल : रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती, मुंबईत घोषणा ; कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट...

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळाला असून रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. वरळीमध्ये झालेल्या जय्यत कार्यक्रमामध्ये रवींद्र चव्हाणांचे नाव अखेर जाहीर करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्यासह प्रमुख भाजप नेते यावेळी उपस्थित होते. रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. रवींद्र चव्हाण हे भाजपचे नावाने बारावे अध्यक्ष असतील. मात्र ते विरोधकांचे राजकीय तेरावे घालतील, विरोधकांचे बारा वाजवल्याशिवाय राहणार नाही असं मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले.
रवींद्र चव्हाण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू नेते म्हणून ओळखले जातात. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचे नेते अशीही त्यांची ओळख आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम केलं. तसेच देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहिलं. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यानंतर ते भाजपचे १२ वे अध्यक्ष म्हणून काम पाहतील.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी निवडून आणणे आणि भाजपला एक नंबरचा पक्ष बनवणे हे त्यांच्या समोरील एक आव्हान असेल.
रवींद्र चव्हाण कोण आहेत? घ्या जाणून…
– २००२ साली भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे कल्याण उपजिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी
– २००५ मध्ये काँग्रेस उमेदवाराचा पराभव करत कल्याण-डोंबिवली महापालिकेत नगरसेवक.
– २००७ मध्ये महापालिका स्थायी समितीचे सभापती.
– २००९ पासून, डोंबिवली विधानसभा मतदारसंघाच्या निर्मितीपासून सलग चार वेळा आमदार.
– २०१६ साली फडणवीस सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात स्थान.
– २०१६ ते २०१९ या काळात बंदरे, माहिती व तंत्रज्ञान, वैद्यकीय शिक्षण तसेच अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या 4 खात्यांच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी.
– रायगड आणि पालघर या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी
– २०२० साली भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री म्हणून नेमणूक.
– २०२२ साली शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री. दोन खात्यांची जबाबदारी.
– सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी.
– अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री पदाच्या कारकिर्दीत ‘आनंदाचा शिधा’, ‘रेशन आपल्या दारी’ सारखे महत्त्वाचे उपक्रम राबवले.
– कट्टर सावरकर भक्त, मॉरिशस महाराष्ट्र मंडळाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा
स्थापन करण्यास मोलाचे सहकार्य.
– राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी यांच्या विचारधारेचे संस्कार.
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत विश्वासू अशी ओळख.
मुख्य संपादक सुनिल थोरात



