२ दुचाकी व १७ मोबाईल हॅन्डसेट चोरणारा चोरटा जेरबंद, ४ लाख १७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त…

तुळशीराम घुसाळकर
पुणे (हडपसर) : काळेपडळ पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने मोठी कामगिरी करत २ दुचाकी व १७ मोबाईल हॅन्डसेट चोरणाऱ्या चोरट्याला जेरबंद केले आहे. या कारवाईत ४ लाख १७ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर गणपत गायकवाड (रा. तरवडेवस्ती, महंदवाडी, पुणे) या आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्याकडून २ दुचाकी व १७ मोबाईल हॅन्डसेट हस्तगत झाले आहेत.
मोबाईल चोरीच्या दाखल गुन्ह्यातील मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण पोलिस हवालदार प्रतिक लाहीगुडे यांनी केले. तपासादरम्यान मोबाईलचे लोकेशन तरवडेवस्ती, महंदवाडी येथे आढळून आले. पोलिस अंमलदार लक्ष्मण काळे, विशाल ठोंबरे, महादेव शिंदे व नितीन ढोले यांनी परिसरात गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचला व आरोपीला दोन मोबाईलसह ताब्यात घेतले.
यानंतर पोलिसांनी आरोपीच्या झोपडीवर छापा टाकला असता, तेथे दोन दुचाकी व पांढऱ्या पिशवीत ठेवलेले १५ मोबाईल फोन आढळून आले. चौकशीदरम्यान आरोपीने मोबाईल हे काळेपडळ व भारती विद्यापीठ परिसरातून तसेच दुचाकी या रस्तापेठ व हांडेवाडी परिसरातून इतर दोन साथीदारांसह चोरी केल्याची कबुली दिली.
ही कारवाई पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-५ राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमर काळंगे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलिस हवालदार प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहीगुडे, श्रीकृष्ण खोकले तसेच अंमलदार विशाल ठोंबरे, शाहीद शेख, लक्ष्मण काळे, नितीन शिंदे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीस्कर व महादेव शिंदे यांच्या पथकाने ही धाडसी कामगिरी केली.
Editer sunil thorat




