ICICI बँकेचा मोठा निर्णय ; बचत खात्यात किमान बॅलेन्सची मर्यादा 5 पट वाढवली…

मुंबई : जर तुमचं खाते आयसीआयसीआय बँकेत असेल तर ही महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आहे. बँकेने बचत खात्यातील किमान बॅलेन्स (Minimum Account Balance – MAB) मर्यादेत मोठी वाढ केली आहे. ही रक्कम आधीच्या तुलनेत तब्बल 5 पट वाढवून मेट्रो व शहरी भागातील ग्राहकांसाठी 50 हजार रुपये करण्यात आली आहे. हा नियम 1 ऑगस्ट 2025 पासून लागू झाला आहे.
पूर्वी ही मर्यादा फक्त 10 हजार रुपये होती. आता मेट्रो व शहरी भागात 50 हजार, निमशहरी भागात 25 हजार आणि ग्रामीण भागात 10 हजार रुपये किमान बॅलेन्स ठेवणं अनिवार्य आहे. नियमांचे पालन न केल्यास ग्राहकांना दंड भरावा लागेल.
या निर्णयामुळे आयसीआयसीआय बँक देशांतर्गत बँकांमध्ये सर्वाधिक मिनिमम अकाऊंट बॅलेन्स असणारी बँक ठरली आहे. त्याच्या तुलनेत, सार्वजनिक क्षेत्रातील एसबीआयने 2020 मध्येच किमान बॅलेन्सची अट रद्द केली होती. इतर खासगी बँकांपैकी एचडीएफसी बँकेत मेट्रो भागात 10 हजार, निमशहरीत 5 हजार आणि ग्रामीण शाखांमध्ये 2,500 रुपये किमान बॅलेन्स ठेवावा लागतो.
एप्रिल 2025 मध्ये आयसीआयसीआय बँकेने बचत खात्यांवरील व्याजदरात 0.25% कपात केली होती. आता बचत खात्यावर 2.75% व्याज, तर 50 लाखांपेक्षा जास्त रकमेवर 3.25% व्याज मिळेल. हा व्याजदर बदल 16 एप्रिलपासून लागू आहे.
बँकेने ग्राहकांना खाते शिल्लक तपासण्याचे व नवीन नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
Editer sunil thorat




