कदमवाकवस्तीतील दोन घरांवर चोरट्यांचा डल्ला : साडेपाच लाखांचा मुद्देमाल गायब…
नोकरदार सुट्टीवर गावी गेल्याचा फायदा ; दोन घरांची फोडफोड...

पुणे (ता. हवेली) : कदमवाकवस्ती परिसरात रविवारी (ता.१७) रात्री अकराच्या सुमारास चोरट्यांनी दोन घरफोड्या करून साडेपाच लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घरफोडीत चोरट्यांनी २३ हजार रुपयांची रोकड व ६ तोळे ४५ ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण सुमारे साडेपाच लाखांचा मुद्देमाल चोरल्याचे समोर आले.
चोरी झालेल्या घरमालकांची नावे अनिकेत मधुकर मोटे (वय ३५) व महादेव विठ्ठल कांबळे (वय ३४) अशी आहेत.
फिर्यादी अनिकेत मोटे हे नोकरीसाठी पुण्यात वास्तव्यास असून सुट्ट्यांमुळे कुटुंबासह गावी गेले होते. रविवारी रात्री घरी परतल्यावर त्यांना कपाट उचकटलेले व सामान अस्ताव्यस्त अवस्थेत आढळले. तपासणी केली असता कपाटातील ५ तोळे ९.५ ग्रॅम सोन्याचे दागिने व १८ हजार रुपयांची रोकड असा ऐवज चोरीस गेला असल्याचे समोर आले.
दरम्यान, दुसऱ्या घरात महादेव कांबळे हे कुटुंबासह कोल्हापूरला गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या घरातून अर्धा तोळा सोन्याची अंगठी व ५ हजार रुपयांची रोकड असा मुद्देमाल चोरून नेला.
या दोन्ही घटनांमध्ये चोरट्यांनी एकूण जवळपास साडेपाच लाखांचा ऐवज चोरून नेल्याचे प्राथमिक निदर्शनास आले आहे.
याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३३१(३), ३३१(४), ३०५ अंतर्गत अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश पैठणे करीत आहेत.
Editer sunil thorat




