
तुळशीराम घुसाळकर
पुणे (ता. हवेली) : परंपरेनुसार भाद्रपद शुद्ध प्रतिपदेपासून चतुर्थीपर्यंत होणाऱ्या थेऊर येथील द्वारयात्रा व चिंतामणी उत्सवाला यंदा मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. थेऊर ग्रामस्थ व पिरंगुटकर देव मंडळी यांच्या पुढाकाराने हा सोहळा पार पडत असून, भाविकांचा मोठ्या संख्येने सहभाग आहे.
द्वारयात्रेनुसार पहिल्या दिवशी कोरेगाव मूळ येथील आसराई देवी, दुसऱ्या दिवशी आळंदी (म्हतोबाची) येथील ओझराई माता, तिसऱ्या दिवशी मांजरी येथील मांजराई माता तर चौथ्या दिवशी थेऊर येथील महा-तारी आई येथे पूजा-अभिषेकाचे आयोजन करण्यात येते.
या यात्रेत सद्गुरू मोरया गोसावी महाराज यांच्या पूजेतील मूर्ती घेऊन ग्रामस्थ व पिरंगुटकर देव मंडळी सहभागी होतात. सद्गुरू मोरया गोसावी यांनी स्थापने केलेल्या या ठिकाणी विशेष पूजा, अभिषेक व आरती केली जाते.
बुधवार, दिनांक २७ रोजी श्री चिंतामणीला अभिषेक व महापूजा करण्यात आली. परंपरेप्रमाणे श्री चिंतामणीला छत्तीस भोगांचा नैवेद्य दाखवण्यात आला. त्यानंतर श्री मोरया गोसावी यांनी रचलेली पदे गाऊन भाविकांनी चिंतामणीचा उत्सव साजरा केला.
या सोहळ्यात श्री चिंचवड देवस्थानच्या वतीने विश्वस्त केशव विध्वंस उपस्थित होते. दरम्यान, मोरया भक्तांनी पालखी मार्गावर जागोजागी सडा, रांगोळी, फुलांची सजावट केली. भाविकांसाठी अल्पोपहार, प्रसाद व चहापाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच मंदिर परिसर आकर्षक सजावट व विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता. ही माहिती पिरंगुट देवस्थानचे मुख्य विश्वस्त शशांक देव यांनी दिली.
Editer sunil thorat




