कौटुंबिक वादातून फिनेल पिऊन तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; व्यंकटेश मित्र मंडळाच्या समयसुचकतेमुळे वाचले प्राण, कार्यकर्त्यांचे सर्वत्र कौतुक

पुणे (ता. हवेली) : कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथे कौटुंबिक वादातून फिनेल पिऊन एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. ही घटना राईलकर हॉस्पिटल परिसरात शनिवारी (ता. २३) रात्री नऊच्या सुमारास घडली. परंतु, व्यंकटेश मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे त्या तरुणाचे प्राण वाचले.
मिळालेल्या माहितीनुसार, व्यंकटेश मित्र मंडळाचे सभासद गणेशोत्सवासाठी वर्गणी गोळा करण्यासाठी पार्क सोसायटीमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांना एका फ्लॅटचा दरवाजा उघडा दिसला. आत पाहिले असता भास्कर लाड (पूर्ण नाव व वय माहिती नाही. रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली) हे बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसून आले. त्यांच्या तोंडातून फेस येत असल्याचेही निदर्शनास आले.
कार्यकर्त्यांनी त्वरित परिस्थितीचा अंदाज घेतला. त्यांनी भास्कर लाड यांना आवाज देऊन उठविण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना त्वरित जिन्यातून खाली आणून रिक्षातून लोणी काळभोर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी उपचार सुरू केले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती दिली आहे.
दरम्यान, भास्कर लाड विवाहित असून कौटुंबिक वादातून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आत्महत्येच्या प्रयत्नामागील नेमके कारण जाणून घेण्यासाठी लोणी काळभोर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
या घटनेनंतर मंडळाचे पदाधिकारी श्रीनिवास पाटील म्हणाले की, “शुल्लक कारणामुळे नागरिक आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. हे अयोग्य आहे. जीवन अनमोल असून अडचणींवर मात करून जगणे हेच खरे जीवन आहे. आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांमुळे आज एका व्यक्तीचे प्राण वाचले याचे आम्हाला समाधान वाटते.”
माणुसकीचा आदर्श…
जर व्यंकटेश मित्र मंडळाचे कार्यकर्ते मदतीला पुढे आले नसते, तर हा प्रकार वेगळ्या वळणावर गेला असता. मात्र कार्यकर्ते श्रीनिवास पाटील, दीपक गवारे, कुणाल मोरे, शुभम मोरे, तोहीद शेख, राहुल मोरे, विपुल साळवे, माऊली मोरे व अभिलाष पाटील यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे एका व्यक्तीचे प्राण वाचले आहेत.
त्यांच्या या माणुसकीपूर्ण कृतीचे सर्वत्र कौतुक होत असून समाजासमोर त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे.
Editer sunil thorat




