बिवलकर कुटुंबाला दिलेल्या वादग्रस्त १२ एकर जागेवर सुरु बांधकामं तातडीने थांबवावीत – आमदार रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी…

नवी मुंबई : सिडकोकडून बिवलकर कुटुंबाला वाटप करण्यात आलेल्या तब्बल ५ हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या वादग्रस्त १२ एकर भूखंडाची आमदार रोहित पवार यांनी स्थानिक भूमिपुत्र, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह पाहणी केली. या पाहणीदरम्यान सद्यस्थितीत संबंधित जागेवर काही बांधकामे सुरु असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले.
या प्रकरणात महत्त्वाचे म्हणजे या जागेबाबत सर्वोच्च न्यायालयात दावा सुरु असून राज्य सरकारने न्यायालयात बिवलकर कुटुंबाच्या विरोधात स्पष्ट भूमिका घेतली आहे. तरीदेखील, सुरू असलेल्या बांधकामामुळे सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या गंभीर विषयाकडे मुख्यमंत्री महोदयांचे लक्ष वेधले. ते म्हणाले, “सध्या सुरु असलेल्या बांधकामांमध्ये अनेक सर्वसामान्य कुटुंबांनी आपले आयुष्यभराचे साठवलेले पैसे गुंतवून घरे घेतली आहेत. जर सर्वोच्च न्यायालयाने बिवलकर कुटुंबाच्या विरोधात निकाल दिला, तर या निरपराध सामान्य लोकांची मोठी फसवणूक होईल. त्यामुळे या जागेवर कुणीही घर घेऊ नये, अशी आम्ही जनतेला सूचना करतो.”
याचबरोबर पवार यांनी आणखी एक ठाम मागणी केली की, “या वादग्रस्त जमिनीवर सुरु असलेली बांधकामे तातडीने थांबवावीत, जेणेकरून पुढील काळात कुणाच्याही मेहनतीचे पैसे वाया जाणार नाहीत. या विषयावर मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने लक्ष घालावे.”
या भूमिपाहणी व पत्रकार परिषदेनंतर स्थानिक नागरिकांमध्येही या प्रकरणाविषयी गंभीर चिंता व्यक्त होत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व हितासाठी राज्य सरकारने त्वरित निर्णय घेण्याची मागणी आता अधिक जोर धरू लागली आहे.
Editer sunil thorat






