
पुणे (हवेली) : गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेली लोणी काळभोर येथील फिल्टर प्लांटच्या पाइपलाइनमधील पाण्याची गळती अखेर थांबली आहे. ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच राहुल दत्तात्रय काळभोर यांनी तातडीने लक्ष घालून ठेकेदाराला काम देत गळती पूर्णपणे थांबवली. या कारवाईमुळे दररोज लाखो लिटर पाणी वाया जाण्यापासून वाचले आहे.
चार वर्षांपासूनची पाणी गळतीची गंभीर समस्या…
सिद्राम मळा, नांदेपाटील वस्ती परिसरातील फिल्टर प्लांटमधून ग्रामपंचायतीच्या पाईपलाईनद्वारे लोणी काळभोर परिसराला पाणी पुरवठा केला जातो. मात्र, या पाइपलाइनमधून गेल्या चार वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होत होती. यामुळे पिण्यायोग्य पाणी वाया जात होते.
ग्रामस्थांनी वेळोवेळी ही समस्या ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणून दिली. मात्र, त्यांना फक्त आश्वासने मिळत राहिली. “ग्रामपंचायत नेहमीच पुढच्या बैठकीत काम करू” एवढाच प्रतिसाद देत होती, असा आरोप ग्रामस्थांनी केला.
विद्यमान सरपंच राहुल दत्तात्रय काळभोर यांचा तातडीचा हस्तक्षेप…
अखेर स्थानिक ग्रामस्थांनी ही गंभीर अडचण विद्यमान सरपंच राहुल दत्तात्रय काळभोर यांच्या कानावर घातली. त्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत ठेकेदाराला पाचारण केले आणि गळतीचे काम करून घेतले. केवळ काही तासांतच गळती रोखण्यात यश आले.
ग्रामस्थांचा दिलासा…
दीर्घकाळाच्या या समस्येवर तातडीने तोडगा काढल्याने ग्रामस्थांनी दिलासा व्यक्त केला आहे. “आता लाखो लिटर पाण्याची बचत होणार असून गावातील पाणीटंचाईचा प्रश्न काही प्रमाणात सुटेल,” असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.
सरपंच राहुल दत्तात्रय काळभोर यांचा नागरिकांना संदेश…
“लोणी काळभोर परिसरात अशा कोणत्याही अडचणी असल्यास नागरिकांनी थेट माझ्याशी किंवा ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा. ग्रामपंचायतीकडून आवश्यक ती तातडीची कारवाई करण्यात येईल,” असे आश्वासन सरपंच राहुल दत्तात्रय काळभोर यांनी दिले.
Editer sunil thorat






