सिंहगड रस्त्यावर पुण्यातील सर्वात मोठा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला…
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण ; पुणेकरांसाठी गणेशोत्सवाचा उपहार...

पुणे : सिंहगड रस्त्यावर पुण्यातील सर्वात मोठा उड्डाणपूल आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. “या पुलामुळे पुणेकरांची वाहतूक कोंडी कमी होणार असून, प्रदूषण घटण्यास मदत होईल. गणेशोत्सवाच्या काळात पुणेकरांसाठी हा एक मोठा उपहार आहे,” अशी भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
राजाराम पुलापासून फन टाईम थिएटरपर्यंत उभारलेला सुमारे अडीच किलोमीटर लांबीचा हा उड्डाणपूल तीन टप्प्यांत ११८.३७ कोटी रुपयांच्या खर्चातून उभारण्यात आला आहे. लोकार्पण सोहळ्यास उपसभापती डॉ. नीलमताई गोरे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार भिमराव तापकीर, बापूसाहेब पठारे, सुनील कांबळे, आ. योगेश टिळेकर, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, शहर पोलीस आयुक्त अमितेश गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते.
तीन टप्प्यांत उभारलेला पूल…
पहिला टप्पा : राजाराम पूल चौकातील ५२० मीटर लांबीचा उड्डाणपूल (खर्च १५ कोटी)
दुसरा टप्पा : विठ्ठलवाडी ते फन टाईम थिएटर दरम्यान २.१ किमी लांबीचा पूल (खर्च ६१ कोटी)
तिसरा टप्पा : वीर शिवाजी काशीद चौक ते कै. प्रकाश इनामदार चौक दरम्यान १.५ किमी पूल (खर्च ४२ कोटी)
वाहतुकीत मोठा दिलासा…
पूर्वी राजाराम पूल ते फन टाईम थिएटर हे २.६ किमी अंतर पार करण्यासाठी सहा चौक ओलांडावे लागत होते व साधारण ३० मिनिटांचा कालावधी लागत होता. नव्या उड्डाणपुलामुळे हा कालावधी आता फक्त ५-६ मिनिटांवर आला आहे. पुलाखालील रस्त्याचे सुयोग्य विकसन, दोन्ही बाजूस तीन लेन, प्रशस्त पदपथ, पार्किंगची सुविधा तसेच सीएसआर अंतर्गत दुभाजकाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे.
दररोज दीड लाखाहून अधिक वाहनांची वाहतूक होणाऱ्या सिंहगड रस्त्यावरील कोंडी कमी करण्यासाठी हा उड्डाणपूल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
Editer sunil thorat






