जिल्हामहाराष्ट्रराजकीय
ठाकरे बंधूंनी दिला एकतेचा संदेश; मुंबईत मराठी शक्तीचं प्रदर्शन!
मुंबईत ठाकरे बंधूंचा मेळावा गाजला; एकत्रित मराठी नेतृत्वाचा नवा अध्याय...

मुंबई : गेल्या अठरा वर्षांपासून परस्परांपासून दुरावलेले ठाकरे बंधू हे आज मराठीच्या मुद्यावरून एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले. ‘एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी’ असे ठामपणे सांगत शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी युती करण्याचे स्पष्ट संकेत दिले.
राज यांनीही ‘मराठी’साठी एकजूट कायम राहावी, बाळासाहेबांचे स्वप्न पुन्हा साकारले जावे, असा आशावाद व्यक्त केला. या मेळाव्यातून मुंबईतील मराठी ताकदीचे दर्शन घडले. ठाकरे बंधूंचे हे मनोमिलन पाहण्यासाठी दोन्ही पक्षांचे हजारो कार्यकर्ते वरळी डोममध्ये एकवटले होते त्यांनी मराठी आणि महाराष्ट्राचा जयजयकार करत परिसर अक्षरशः दणाणून सोडला होता.
राज आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या एकत्रित ताकदीचे काय परिणाम दिसू शकतात याची झलक या मेळाव्यातून दिसली. उद्धव ठाकरेंनी राजकीय युतीला उघड प्रतिसाद दिला असला तरी राज ठाकरे यांनी ‘हिंदी सक्ती’ च्या अजेंड्यावर कायम राहत या मनोमिलनाला राजकीय वास येणार नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे यांनी कथित हिंदी सक्तीमागील राजकारण तर राज ठाकरेंनी हिंदी सक्तीच्या विरोधाचे सामाजिक, सांस्कृतिक पैलू जनतेसमोर मांडले.
‘तुमच्या सात पिढ्या उतरल्या तरी हिंदीची सक्ती होऊ देणार नाही,’ असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला. तर राज ठाकरेंनी ‘भाषेला हात लावून त्यांनी चाचपडून पाहिले, महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्यासाठीची ही चाचपणी होती. मजाक वाटला काय?’ अशा शब्दांत सुनावले.
..तो क्षण डोळ्यांत साठवला…
वरळीच्या एनएससीआय डोममधील प्रेक्षकांची क्षमता ही आठ हजारांची असताना त्यापेक्षा दुप्पट कार्यकर्त्यांनी जमिनीवर बसून, उभे राहून ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाचा क्षण डोळ्यांमध्ये साठविला होता. त्रिभाषा सूत्राचे आदेश राज्य सरकारने मागे घेतल्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेसह विरोधी पक्षांनी पुकारलेला मोर्चा मागे घेण्यात आला होता, मात्र त्याच तारखेला विजयी मेळावा आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले होते.
…अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांचीही हजेरी…
काँग्रेसच्या नेत्यांनी या मेळाव्याकडे पाठ फिरवली असली तरी मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते मात्र या मेळाव्यात सहभागी झाले होते. काँग्रेसचे माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे, आ. जितेंद्र आव्हाड यावेळी उपस्थित होते. विशेष म्हणजे डाव्या पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते दोन्ही ठाकरे बंधूंच्या खांद्याला खांदा लावून उपस्थित होते होते. यामध्ये माकपचे राज्य सचिव कॉ. डॉ. अजित नवले, भाकपचे कॉ. प्रकाश रेड्डी, लाल निशाण पक्षाचे कॉ. उदय भट, शेकापचे जयंत पाटील, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यावेळी हजर होते. त्याचबरोबर मराठी कलावंत तेजस्विनी पंडित, भरत जाधवसह अनेक कलाकारही हजर होते. मोर्चाचे रूपांतर हे विजयी मेळाव्यात करण्यात आले असले तरी या निमित्ताने कोणताही राजकीय झेंडा नाही, फक्त मराठीचा अजेंडा अशी हाक देण्यात आली.
अनाजीपंतांनी अंतरपाट दूर केला – उद्धव ठाकरे
राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्याचे दु:ख बाळासाहेब ठाकरेंना शेवटपर्यंत होते. शेवटच्या मुलाखतींमध्ये त्यांनी राज आणि उद्धव यांनी एकत्र यावे. या दोघांनी वेगळे होण्यामुळे शिवसेनेचे नुकसान होत असल्याचे म्हटले होते. बाळासाहेबांच्या या स्वप्नाच्याच संदर्भाने राज ठाकरे यांनी पुढे-पुढे काय-काय गोष्टी होतील याची कल्पना नाही.
परंतु मला असे वाटते ही मराठीसाठीची एकजूट कायम राहावी. महाराष्ट्रामध्ये सन्माननीय बाळासाहेबांचे जे स्वप्न होते ते पुन्हा साकारावे, अशी एक आशा, अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो, असे ते म्हणाले. या माध्यमातून त्यांनी उद्धव ठाकरेंना साद घातल्याचे मानले जाते. उद्धव ठाकरेंनी लगेच प्रतिसाद देत, ‘आमच्या भाषणापेक्षा आमचे एकत्र दिसणे महत्त्वाचे आहे. आमच्या दोघांमध्ये जो अंतरपाट होता तो अनाजीपंतांनी दूर केला. अक्षता टाकण्याची त्यांच्याकडून अपेक्षा नाही पण एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी’ असे भाष्य करताच संपूर्ण डोम टाळ्यांच्या कडकडाटाने दणाणून निघाला.
…अशीही ‘राज’गर्जना…
राजकारणात युत्या, आघाड्या होत राहतील. महाराष्ट्र, मराठी भाषा आणि मराठी माणूस याच्याबाबतीत कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही. मराठी भाषेला हात लावून त्यांनी चाचपडून पाहिले आहे पण कोणाची माय व्यायली आहे त्याने महाराष्ट्र आणि मुंबईला हात घालून दाखवावा. मजाक वाटला काय? आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू नाही आहोत. तुमच्या हातात सत्ता असेल ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर. कोणत्याही वादापेक्षा आणि कुठल्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आज जवळपास अठरा वर्षांनंतर मी आणि उद्धव एका व्यासपीठावरती येत आहोत. आम्हाला एकत्र आणायचे काम जे बाळासाहेबांना जमले नाही, जे अनेकांना जमले नाही ते देवेंद्र फडणवीस यांना जमले.
त्रिभाषा सूत्र हे फक्त केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील दुव्यासाठी आहे. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात सगळा कारभार इंग्रजीमध्ये चालतो. कुठे आहे त्रिभाषा सूत्र? केंद्राच्या शिक्षण धोरणातही नाही. इतर कोणत्याही राज्यात नाही त्यांनी महाराष्ट्रात प्रयोग करून पाहिला. दक्षिणेतील राज्ये त्यांना हिंग लावून विचारत नाही. उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान, मध्यप्रदेशमध्ये कोणती तिसरी भाषा आणणार आहात. जी हिंदी भाषिक राज्ये आहेत ती आर्थिकदृष्ट्या मागास आणि हिंदी न बोलणारी जी राज्ये आहेत ती आर्थिकृष्ट्या प्रगत आहेत. हिंदी भाषिक राज्यांमधून नोकरी धंद्यासाठी लोक इकडे येत असतील तर ती भाषा नेमकी कोणासाठी शिकायची. कोणतीही भाषा ही श्रेष्ठच असते. एक भाषा उभी करायला प्रचंड तपश्चर्या लागते. एक लिपी उभी करायला खूप ताकद लागते.
…उद्धव ठाकरेंचा घणाघात…
तुमच्या सात पिढ्या जरी उतरल्या तरी हिंदीची सक्ती होऊ देणार नाही. आणि तसा प्रयत्न कराल तर तुम्हाला आमची शक्ती अशी दाखवू की तुम्ही पुन्हा डोके वर काढणार नाही. महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस न्याय्य मागण्यासाठी आंदोलन करत असेल व त्याला तुम्ही गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत. न्याय मागणे म्हणजे गुंडगिरी नाही आणि जर तुमच्या दरबारी न्याय मिळत नसेल तर आम्ही गुंडगिरी करूच. आम्ही फक्त महापालिका निवडणुकीपर्यंत एकत्र येतो असे काही जण म्हणाले. काही जण म्हणतात यांचा ‘म’ मराठीचा नाही तर महापालिकेचा आहे. अरे नुसता महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचाही आहे. आम्ही महाराष्ट्र देखील काबीज करू.
हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही. आम्ही मराठी बोलणारे तुमच्या पेक्षाही अस्सल, कडवट देशाभिमानी हिंदू आहोत. तुम्ही काय आम्हाला हिंदुत्व शिकवता. आज जे बोलताय की आम्ही मराठी नाही का, त्यांना मला सांगायचे आहे की तुम्ही फक्त नावाला मराठी आहात. तुमच्या अंगात रक्त आहे की नाही याचा तपास करावा लागेल. काही दिवसांपूर्वी यांनी एक फेक नरेटिव्ह पसरवला की ही हिंदी सक्ती उद्धव ठाकरेंच्या काळातील आहे. मी अभिमानाने सांगेन की मी मुख्यमंत्री असताना मी महाराष्ट्रात मराठीची सक्ती केली. मला त्याचा अभिमान आहे. काय केलेत त्या मराठी भाषा सक्तीचे तुम्ही? मराठी भाषा महाराष्ट्रात सक्तीची करावी लागते. महाराष्ट्रात मराठीची सक्ती केल्यानंतर काही लोक कोर्टात गेले. कोण आहेत ते मराठीचे दुश्मन. ती गुंडगिरी होत नाही का? ही सगळी यांची पिलावळ आहे.
…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला…
हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल? आपला मालक आला म्हणून त्याच्यासमोर जय गुजरात म्हणणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल का? आम्ही कुणावर दादागिरी करणार नाही आणि कुणी केली तर ती सहनही करणार नाही. मराठा- मराठेतर, ब्राह्मण- ब्राह्मणेतर असे सर्व मतभेद बाजूला ठेवून मराठी माणसांची एकजूट करा. तुटू नका, फुटू नका, मराठी ठसा पुसू नका.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री..
उद्धव आणि राज ठाकरे या बंधूंचा मेळावा हा विजयोत्सव नाही तर रुदाली आहे. राज यांचे अभिनंदन करतो. दोन्ही बंधू एकत्र येण्याचे श्रेय त्यांनी मला दिले. बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद मलाच मिळाले असतील. ठाकरे यांच्या काळात मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झाला पण या मराठी माणसाला आम्ही हक्काचे घर दिले. याची असूया त्यांच्या मनामध्ये आहे.
एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री…
मराठी भाषेबद्दल राज ठाकरे यांची तळमळ दिसून आली, तर उद्धव ठाकरे यांच्या भाषणात आगपाखड, द्वेष, जळजळ, सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी मळमळ होती. त्यांनी मराठीचा नाही तर स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा बोलून दाखविला. राज्यात पहिली ते बारावीपर्यंत हिंदीसक्तीचा अहवाल मान्य केल्याबद्दल ते मराठी माणसाची माफी मागतील, अशी अपेक्षा होती; मात्र त्यांनी राजकीय आखाडा केला.
महत्वाची मुद्दे राज ठाकरे पुढे म्हणाले,
मराठी माणसाने आणखी सावध राहावे.
जातीपातीचे राजकारण पुन्हा सुरू होईल.
नाटके केली तर कानाखाली आवाज काढा.
फडणवीसांनी आम्हाला एकत्र आणले.
अमित शहा यांना स्वतःला इंग्रजी येत नाही.
अनेक बडे नेते हे इंग्रजी शाळांमध्ये शिकले.
महत्वाचेऔ मुद्दे उद्धव ठाकरे म्हणाले,
हात उगारला तर तो जागेवर ठेवू नका.
इतर राज्यांत दादागिरी करणारे मराठी दाखवा.
अन्य राज्ये भाषेबाबत तडजोड करत नाहीत.
भाजपवाले कोठेही गेले तरी भांडणे लावतात.
भाजपची नीती फोडा अन् राज्य करा.
हिंदू आणि हिंदुस्थान मान्य पण हिंदी नाही.
सावध रहा.. फोडण्याचे प्रयत्न होतील.
दोन्ही ठाकरे बंधूनी यावेळी मराठी माणसाला सावध राहण्याचा इशारा दिला. राज ठाकरे म्हणाले, ‘आगामी काळात तुम्हाला जातीपातींमध्ये विभागले जाईल. पुन्हा हे जातीचे कार्ड खेळायला सुरुवात करणार. मराठी म्हणून तुम्हाला कधीही एकत्र येऊ देणार नाहीत.’
तर उद्धव ठाकरे म्हणाले, ‘मराठी माणूस एकमेकांसोबत भांडला व दिल्लीचे गुलाम आपल्या डोक्यावर राज्य करायला लागले. आपण मराठीजण एकत्र येतो व सत्ता गेली की आपण भांडायला लागतो. हा नतद्रष्टपणा आता करायचा नाही. मराठा- मराठेतर, ब्राह्मण- ब्राह्मणेतर असे सर्व मतभेद बाजूला ठेवून मराठी माणसांची एकजूट करा. तुटू नका, फुटू नका, मराठी ठसा पुसू नका.’
Aditar sunil thorat








