गोळीबार केल्या प्रकरणी ८ आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई ; वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे…

पुणे (हवेली) : तीन महिन्यांपूर्वी हवेली तालुक्यातील थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील जय मल्हार हॉटेल नजीक उघड्यावर लघुशंका का केली? असा जाब विचारल्याच्या कारणावरून ८ जणांनी सुरक्षारक्षक व त्यांच्या पत्नीला हाताने व दगडाने बेदम मारहाण केली होती.
त्यातील एकाने गोळीबार केल्याची घटना २७ डिसेंबर २०२४ रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली होती. या गुन्ह्यातील ८ आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार टोळी प्रमुख भरत तुकाराम जैद, मयूर शंकर जाधव (वय ३२, रा. मु.पो. कुरुळी, बांदल वस्ती, दत्त मंदिराच्या बाजूला ता. खेड जिल्हा पुणे), प्रथमेश उर्फ सोन्या आनंदा वाहिले (वय २३ , रा केळगाव, चिंबळी, आळंदी रोड, राधाकृष्ण मंदिराजवळ ता. खेड, जि. पुणे) सतीश बारीकराव लोखंडे (वय ३१) अजय दशरथ मुंढे (वय-२६), भानुदास दत्तात्रय शेलार (वय ३२ सर्व रा. चिंबळी फाटा, ता. खेड, जि. पुणे) व बाजीराव रामराव सरांडे (रा. कुरुळी पुर्ण पत्ता माहीती नाही), व आकाश शशिकांत तावडे (वय ३३, धंदा नोकरी रा. संजय गांधी नगर) यांच्यावर मोकाची कार5वाई करण्यात आली आहे. गोळीबारात शीतल अक्षय चव्हाण (वय-३२, रा. चव्हाणवस्ती, थेऊर ता. हवेली) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तर या प्रकरणी शीतल यांचे पती अक्षय चव्हाण यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
मोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेले आठही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर चाकण, आळंदी, भोसरी, भोसरी एम आय डी सी, निगडी, दिधी, व पिंपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुन, खुनाचा प्रयत्न, दंगा, बेकायदेशीररीत्या हत्यारे बाळगुन दहशत निर्माण करणे, सार्वजनिक रस्त्यावर बेदरकापणे वाहन हाकून खुन नसलेला सदोष मनुष्य वध करणे, बेकायदेशीररीत्या हत्यार जवळ बाळगणे, बलात्कार, ठकवणुक, दहशत पसरविणे इत्यादी प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्यातबरोबर आरोपींवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात खुनासह विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
टोळीप्रमुख भरत जैद व त्याच्या साथीदारांनी टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी वरील गुन्हे केलेले आहेत. त्यांच्या गुन्हेगारी वृत्तीमुळे टोळीची दहशत नागरिकांच्या मनात निर्माण झाली होती. त्यामुळे या टोळीवर कायद्याचा वचक बसावा म्हणून लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी मोका चा प्रस्ताव तयार करून पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त, मनोज पाटील यांच्याकडे पाठविला होता. मनोज पाटील यांनी हा प्रस्ताव मंजूर करून आरोपींवर गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा कलमान्वये मंजूर केला आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर भर देवुन शरीराविरुद्धचे व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून, गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्याचे उद्देशाने कठोर पावले उचलण्यासाठी सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
सदर कामगिरी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलिस उपनिरीक्षक उदय काळभोर, पोलीस हवालदार तेज भोसले, संभाजी देवीकर, पोलिस अंमलदार प्रशांत नरसाळे, मंगेश नानापुरे, संदिप घुमाळ व योगिता भोसुरे यांच्या पथकाने केली आहे.



