छत्रपती संभाजी महाराज स्मारक विकासाचा आढावा ; गुणवत्तेसह कामे जलद पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले…

पुणे : स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या तुळापूर येथील बलिदानस्थळ व वढू बु. येथील समाधीस्थळाच्या विकासकामांचा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आढावा घेतला. स्मारक विकासाची कामे गुणवत्तापूर्ण, टिकाऊ व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
या पाहणी दरम्यान आमदार ज्ञानेश्वर कटके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे, अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, उपअभियंता अजय पाटील आदी उपस्थित होते.
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, “छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाच्या पवित्र भूमीत आल्यावर ऊर्जा लाभते. महाराजांनी धर्मासाठी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करून या स्थळाला पर्यटनस्थळ नव्हे तर तीर्थस्थळ म्हणून पाहिले जावे. या ठिकाणाला तीर्थस्थळाचा दर्जा मिळावा, अशी अपेक्षा आहे.”
स्मारकाच्या विकासासाठी केईएम हॉस्पिटलची जागा हस्तांतरणाचा प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठवला असून, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत पुढील आठवड्यात चर्चा होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. संपूर्ण समाधीस्थळाचे सुशोभीकरण प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लोकसेवा प्रतिष्ठानच्या पुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेला भेट दिली. विद्यार्थ्यांच्या मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांचे व रांगोळीच्या माध्यमातून साकारलेल्या त्यांच्या चित्राचे कौतुक केले. तसेच ‘ईश्वरपुरम्’ या पूर्वांचलातील विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाला भेट देऊन बांधकामाची माहिती घेतली आणि चीन–म्यानमार सरहद्दीवरील विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Editer sunil thorat




