तरडे येथे शेतीच्या वादातून हल्ला! दोन सख्ख्या भावांसह ५ जणांना बेदम मारहाण ; ७ जणांवर गुन्हा, तिघांना अटक…

पुणे (हवेली) : हवेली तालुक्यातील तरडे ग्रामपंचायत हद्दीत शेतीच्या वादातून निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणात दोघा सख्ख्या भावांसह पाच जणांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. गुरुवारी (३१ जुलै) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास गट क्रमांक २४८ मध्ये ही घटना घडली. या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले असून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली असून उर्वरित आरोपी फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण राघू गडदे (५५) व शिवा राघू गडदे (दोघे रा. तरडे) हे सख्खे भाऊ असून त्यांच्या शेतजमिनीवरून बरकडे कुटुंबीयांशी जुना वाद सुरू आहे. याच वादासंदर्भात न्यायालयीन स्थगिती (स्टे) आदेश लागू असूनही गुरुवारी सकाळी एका ट्रॅक्टरद्वारे अतिक्रमण करत पेरणी सुरू करण्यात आली होती.
शेतात ट्रॅक्टर सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर लक्ष्मण गडदे आपल्या भावासह आणि कुटुंबीयांसह घटनास्थळी गेले. ट्रॅक्टरबाबत विचारणा करताच आरोपींनी रागाच्या भरात त्यांच्यावर लाकडी दांडक्यांनी हल्ला चढवला. हल्लेखोरांनी “ही जमीन आम्हाला मिळाली पाहिजे, आता दाखवतो काय ताकद आहे” अशा स्वरूपाच्या धमक्या देत गंभीर मारहाण केली.
या हल्ल्यात लक्ष्मण गडदे व शिवा गडदे हे गंभीर जखमी झाले असून बबन लक्ष्मण गडदे, श्रीकांत लक्ष्मण गडदे व दत्ता नामदेव गडदे हे किरकोळ जखमी झाले आहेत. सध्या गंभीर जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या आरोपींविरोधात गुन्हा दाखल…
अंकुश रामभाऊ बरकडे (४८), लहु रामभाऊ बरकडे (४८), राजु रामभाऊ बरकडे (४२), राहुल लहु बरकडे (२४), आदेश अंकुश बरकडे (१९), तुषार अंकुश बरकडे (२२), गणेश लहु बरकडे (२०) या सात आरोपींपैकी अंकुश बरकडे, तुषार बरकडे व राजू बरकडे यांना पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे, तर अन्य चार आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के करत असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
Editer sunil thorat






