सौजन्य – फोटो सोशल मीडिया
पुणे (हवेली) : हवेली तालुक्यातील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या तिर्थक्षेत्र थेऊर येथे लाथा बुक्याने व काठीने मारहाण करत रेड्याचा छळ केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी गोरक्षक गणेश केवलराव शिंदे (वय ३०, रा. यश हॉस्पीटल समोर, माळवाडी, हडपसर, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बनकर लोंढे व हिरामण लोंढे (पूर्ण नाव व वय माहीत नाही, दोघे रा. थेऊर ता. हवेली जि. पुणे) यांचेवर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश शिंदे अनेक वर्षापासून गोरक्षक म्हणून काम करतात. ते त्यांचा मित्र अथर्व सनस या़च्या समवेत थेऊरमार्गे कोलवडीच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी गारुडी वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बनकर लोंढे व हिरामण लोंढे हे दोघेजण एका रेड्याला हात, लाथा बुक्याने व काठीने मारहाण करीत होते. त्यातील एक जण रेड्याच्या शेपटाला मुरगाळत होता. तर दुसरा रेड्याच्या शिंगाला धरुन जोरजोरात ओढत होता. त्यामुळे होत असलेल्या त्रासाने तो रेडा मोठमोठ्याने ओरडत होता.
या अमानुष मारहाणीमुळे रेड्याला होत असलेल्या वेदना पाहून शिंदे व सनस हे तेथे गेले. व त्यांनी तुम्ही कशाला मारता त्याला प्रेमानी घेऊन जावा असे सांगितले. तेव्हा बनकर लोंढे व हिरामण लोंढे म्हणाले, हा रेडा आमचा आहे. आम्ही काहीही करू, तुम्हाला काय करायचे आहे, असे म्हणत रेड्याला घेऊन जाऊ लागले. त्या दोघांना तेथेच थांबवून रेड्याला त्रास देणे गुन्हा आहे असे सांगितले. परंतु त्यांनी काहीही न ऐकता रेड्याला त्रास देणे सुरुच ठेवले. त्यानंतर शिंदे यांनी सदर घटनेबाबत लोणी काळभोर पोलिसांना कळवले.
माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आल्याची चाहूल लागताच, दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले आहे. पोलिसांनी रेडा ताब्यात घेऊन गोशाळेत पाठविला आहे.
बनकर लोंढे व हिरामण लोंढे या दोघांनी रेड्याला क्रूरपणे वागवणुक देऊन असह्य वेदना होतील अशाप्रकारे त्रास दिला आहे. अशी फिर्याद गणेश शिंदे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार दोघांच्या विरोधात प्राण्यांचा छळ प्रतिबंध कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार चंद्रकांत माने हे करत आहेत.
मुख्य संपादक सुनिल थोरात
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा