अट्टल चोरटा जेरबंद ; २ लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत…

तुळशीराम घुसाळकर
फुरसुंगी (पुणे) : बंद घरे निवडून दिवसा घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरट्याला फुरसुंगी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने जेरबंद केले आहे. या कारवाईत तब्बल २ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, अटक आरोपीने पुणे शहर व पिंपरी-चिंचवड परिसरातील अनेक घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपीचे नाव आर्यन अजय माने (रा. आशिर्वाद पार्क, फुरसुंगी, पुणे) असे आहे. २४ ऑगस्ट रोजी मंतरवाडी येथील व्यावसायिक मयुर अग्रवाल यांच्या घरात झालेल्या घरफोडीच्या तपासातून या सराईताला गजाआड करण्यात आले. या घरफोडीत सोन्याचे दागिने, चांदीची मूर्ती व रोकड मिळून तब्बल ४ लाख ९५ हजारांचा ऐवज चोरला गेला होता.
या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार हेमंत कामथे व हवालदार नितीन गायकवाड करीत होते. त्यांनी परिसरातील ६१ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी केली. त्यातून मिळालेल्या तांत्रिक पुराव्यांवरून व गुप्त माहितीच्या आधारे फुरसुंगीतील पॉवर हाऊस परिसरात संशयित दुचाकी सापडली. ती आरोपी आर्यन माने वापरत असल्याचे समजताच पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.
चौकशीत आरोपीने कबुली देत सांगितले की, त्याने केवळ मंतरवाडीच नव्हे तर लष्कर, वानवडी, पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात देखील घरफोड्या केल्या आहेत. तसेच चोरीचा मुद्देमाल त्याने आपल्या साथीदाराकडे — जावेद अबुबखर बागवान (रा. गुलटेकडी, पुणे) याच्याकडे विल्हेवाटीसाठी दिल्याचे उघड झाले.
पोलिसांनी या कारवाईत १ लाख ६० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व चोरीसाठी वापरलेली दुचाकी असा एकूण २ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या कारवाईत फुरसुंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे, गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेश खांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विष्णु देशमुख, हवालदार नितीन गायकवाड, हरिदास कदम, सागर वणवे, श्रीनाथ जाधव, अंमलदार हेमंत कामथे, अभिजित टिळेकर, योगेश गायकवाड, विनायक पोमन, नितीन सोनवणे यांनी ही यशस्वी कामगिरी केली.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विष्णु देशमुख करीत आहेत.
Editer sunil thorat



